'सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचे वास्तव्य हिरावले'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

रत्नागिरी - आपल्या संरक्षणासाठी किनारपट्टीवर खारफुटीची जंगले निसर्गतः निर्माण झाली. ती कुणीही लावलेली नाहीत; परंतु मुंबई, नवी मुंबईसारखी मोठी शहरे खारफुटी तोडूनच निर्माण झाली आहेत. आपला विनाश आपणच करीत आहोत. आज सिमेंटची जंगले निर्माण करताना प्राणी, पक्ष्यांचे वास्तव्य हिरावत चालले आहे. कीटकांकडून खूप काही घेण्यासारखे आहे. खरं तर विश्वाची वाट मनुष्याने लावली आहे, अशी खंत प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली.

जनसेवा ग्रंथालयाच्या वतीने राणी लक्ष्मीबाई सभागृहात डॉ. अवचट यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी त्यांची मुलाखत घेताना त्यांच्या अनेक पैलूंचा उलगडा केला. प्राणी, पक्षीप्रेमी म्हणून ओळख असलेल्या डॉ. अनिल अवचट यांना प्रत्येक विषयावरील अभ्यासाचे सखोल विवेचन करणारे प्रश्न श्री. कामत यांनी उपस्थित केले. 

डॉ. अवचट म्हणाले की, फार विचार करीत नाही; परंतु दुसऱ्याचे दुःख मला लगेच कळते. जंगलात जायला लागल्यापासून सापापासून किड्यापर्यंत, तर पक्ष्यांपासून प्राण्यांपर्यंत सर्वांची भाषा समजू लागली. त्यांच्या व्यथा खूपच वेदनादायी आहेत. आज सर्वसमावेशक विचार करण्याची आवश्‍यकता आहे. सिमेंटच्या जंगलापेक्षा शिखरावर बसल्यावर वाऱ्याची येणारी एक झुळूक आल्हाददायक वातावरण निर्माण करते. माणसाला बुद्धी मिळाली, परंतु आज आपण नेमकं काय करतो याचा विचार करण्याची खरी गरज आहे.

मित्र बापू महाजन यांच्यासोबत पहिल्यांदा जंगलात जायला शिकलो. त्यावेळी किड्याचे जग जवळून पाहायला मिळाले. त्यातून खूप काही शिकता आले. आपण नेहमी स्वतःचा विचार करतो; परंतु या विश्वात सर्व प्राणी, पक्षी, कीटक असणे आवश्‍यक आहे, तरच ती साखळी पूर्ण होऊ शकते. 

जगण्याची खरी सूक्ष्मता निसर्गामध्ये
निसर्गामध्ये खरे सुख मिळते. जगण्याची खरी सूक्ष्मता तेथे आहे. पहिल्यांदा साप पाहिल्यानंतर गोंधळून गेलो होतो; परंतु आजीने साप हा आपला रखवालदार आहे, असे सांगून भीती घालविली. आज सापाच्या जीवनाचा अभ्यास करताना त्याला होणाऱ्या वेदना मला समजू लागल्या आहेत. कात टाकताना महिनाभर पडून राहावे लागते. यावेळी अनेक धोके असतात. ते पत्करून साप नव्या आयुष्याला सुरवात करतो. सापामुळे आपण उंदीरमुक्त राहू शकतो, अन्यथा आज उंदिर आपल्या घरात फिरले असते. फवारणीमुळे आपण पक्ष्यांचा आपलेपणा हिरावून घेतला आहे.

Web Title: Famous writer Dr. Anil Avchat expressed his anguish