फणसाड अभयारण्यात पाण्याचा सुकाळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

बशी व सावराट तलावांमुळे भागवतेय पशुपक्ष्यांची तहान
नांदगाव (जि.रायगड) - फणसाड अभयारण्यात (ता. मुरुड) यंदा कोणत्याही प्रकारे पाण्याची टंचाई नाही. गेल्या वर्षी निर्माण केलेल्या बशी व सावराट या तलावांत मुबलक पाणीसाठा असल्याने ते पशु-पक्ष्यांची तहान भागवत आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी दिली.

बशी व सावराट तलावांमुळे भागवतेय पशुपक्ष्यांची तहान
नांदगाव (जि.रायगड) - फणसाड अभयारण्यात (ता. मुरुड) यंदा कोणत्याही प्रकारे पाण्याची टंचाई नाही. गेल्या वर्षी निर्माण केलेल्या बशी व सावराट या तलावांत मुबलक पाणीसाठा असल्याने ते पशु-पक्ष्यांची तहान भागवत आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी दिली.

मुरूड तालुक्‍याचे तापमान सध्या 36 ते 38 अंशावर आहे. अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसत असताना फणसाड अभयारण्यातील पशु-पक्ष्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नाही, असे तडवी यांनी सांगितले. 2017 च्या सुरवातीस अभयारण्यात बशी तलावाची निर्मिती करण्यात आली. याला बशीसारखा आकार देण्यात आला आहे. गर्द झाडीच्या बाजूला हा तलाव खोदण्यात आला आहे. त्यामध्ये दर दोन दिवसांनी पाणी सोडण्यात येते.

सावराट गाणीनजीक 2016 मध्ये एक तलाव सरकारी निधीतून तो खोदण्यात आला आहे. या तलावाला चांगले झरे असल्याने त्यात भरपूर पाण्याचा साठा आहे. येथे सांबर, माकडे व अन्य पशु-पक्षी पाणी पिण्यासाठी येत असल्याचे तेथे लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याने टिपले आहे. या व्यतिरिक्त जंगलात एकूण 27 ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत. चिखलगाण येथेही बारा महिने मुबलक पाणी उपलब्ध असते. त्यामुळे या अभयारण्यात पाणीटंचाई कधीच भासत नाही, असा दावा तडवी यांनी केला. आगामी काळात अभयारण्यातील पशु-पक्ष्यांसाठी तीन बोअरवेल खोदण्याचा प्रस्ताव आहे.

बससेवेची गरज
विविध पशु-पक्ष्यांचे अस्तित्व असलेले फणसाडचे जंगल फुलेफळे, वृक्षवेलींनी बहरले आहे. पक्षिनिरिक्षणासाठी येथील वातावरण उपयुक्त आहे. येथे शेकरू व गिधाडांची संख्या वाढली आहे, अशी माहिती वनक्षेत्रपालांनी दिली. मुंबई-पुण्यासारख्या शहरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात फणसाडला येतात. त्यांना येण्या-जाण्यासाठी बस अथवा अन्य वाहने उपलब्ध झाल्यास पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. येथे स्थानिक महिला बचत गटांतर्फे अल्प दरात सुग्रास असे भोजन व न्याहारीचे पदार्थ तयार करून दिले जातात.

Web Title: fansad forest water shortage