खरीपाची लगबग, कोरोना महामारीतही लाखांचा पोशिंदा राबतोय रात्रं दिवस

farming planning konkan sindhudurg
farming planning konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. एकीकडे कोरोनासारख्या महामारीचे संकट असतानाही लाखांचा पोशिंदा असलेला शेतकरी शेतीच्या कामाकडे वळला असून बाजारात आलेली बी-बियाणे, खते खरेदीसाठी सध्या गर्दी होत आहे. यंदा खतांच्या किंमती कमी असल्याने बळीराजाला थोडा दिलासा मिळाला आहे. तालुका खरेदी विक्री संघ व खाजगी कृषी सेवा केंद्रातून आतापर्यंत 800 क्विंटल भात बियाणे तर एक हजार क्विंटल खतांची उचल झाली आहे. 

एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच दुसरीकडे खरीपाचा हंगामाचा हंगाम सुरू झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी काहीशी आधी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मॉन्सून वेळेत हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले. तर केरळात मॉन्सूनने आपली हजेरी लावल्याने कोकणात आठ दिवसांत मॉन्सून दमदार एंट्री करण्याचे संकेत आहेत. एकूणच या परिस्थितीनुसार शेतकरीही सज्ज झाला आहे. गावागावात भात बियाणे पेरणीच्या कामांची लगबग दिसून येत आहे. 

सावंतवाडी तालुक्‍यात मोजकी कृषी सेवा केंद्र आहेत. या कृषी सेवा केंद्रामधुन मोठ्या प्रमाणात भात बियाणे व खताचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जातो. सद्यस्थितीत शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात खत व भात बियाणे कृषी सेवा केंद्रात उपलब्ध आहेत. तर सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघानेही मोठ्या प्रमाणात खत व बियाण्यांची उपलब्धता केली आहे. तालुका विक्री संघाने आतापर्यंत 400 क्विंटल भात बियाणे तर सातशे क्विंटल खताची विक्री केली आहे. याच्या तुलनेत खाजगी कृषी सेवा केंद्रातून ही मोठ्या प्रमाणात खत व बियाण्यांची विक्री झाली आहे. हा सर्व आकडा लक्षात घेता आतापर्यंत सुमारे 800 क्विंटल भात बियाणे तर 1000 क्विंटल खतांची उचल शेतकरी वर्गातून केली आहे. 

सध्या जया, कर्जत, कोमल, प्रसन्न, सुवर्णा, श्रीराम, कस्तुरी, चंदू, सिल्की, रत्नागिरी, शुभांगी, मसूरी, एराईज, रूपाली, सोनम, अमन या जातीची भात बियाणे तर युरिया, बीएपी, एएसपी, एओपी, सुफला, सम्राट, सुवर्णा, कृषी उद्योग आदी खते तालुका खरेदी विक्री संघ व खाजगी कृषी सेवा केंद्रात उपलब्ध आहेत. लॉकडाउनमुळे काहीप्रमाणात खते व बियाणे वेळेत उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही कृषी विभागाकडून जिल्हावासीयांना वेळेत बी बियाणे व खते उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 

गतवर्षीपेक्षा खतांच्या किंमतीत काहीसा दिलासा शेतकऱ्याला मिळाला आहे. गेल्यावर्षी पंधराशे रुपये किंमत असलेल्या पन्नास किलोच्या सम्राट या खताच्या किमतीत यंदा अडीचशे रुपयाची घसरण झाली आहे. बियाणांचे दर मात्र स्थिर असल्याचे दिसते. 

पारंपरिक शेतीकडून अधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल मोठा आहे. यावर्षी अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्रामार्फत 350 शेतकऱ्यांनी पावर टिलरची मागणी केली. तर आतापर्यंत 50 टन खत व 12 टन बियाणे आपल्याकडून विक्री करण्यात आली. यावर्षी खतांच्या दरात काहीशी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे. 
- अन्नपूर्णा कोरगावकर, अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र, सावंतवाडी 

खत*की.ग्रॅ.*किंमत 
बी.ए.पी*50*1846 
ए एसपी*50*360 
ए ओपी*50*950 
कृषी उद्योग*50*1025 
युरिया*45*266*50 

बियाणे*की.ग्रॅ*किंमत 
कर्जत*10*420 
जया*10*420 
कोमल*5*625 
प्रसन्न*10*1500 
सुवर्णा*10*420 
कर्जत*7*10*420 
श्रीराम*10*580 
कस्तुरी*10*950 
सिल्की*10*1100 
एराईज*1*370 
सोनम*10*1200 
शुभांगी*10*1200 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com