दोन मित्रांमध्ये 'या' निवडणुकीत होणारी लढत लक्षवेधी 

Fight Between Two Friends In Banda Grampanchayat Election
Fight Between Two Friends In Banda Grampanchayat Election

बांदा ( सिंधुदुर्ग ) - बांदा ग्रामपंचायत सरपंच पोटनिवडणूकीसाठी भाजपचे अक्रम खान व शिवसेनेचे मकरंद तोरस्कर यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. विद्यार्थी दशेपासून क्रिकेटच्या मैदानावरील जिगरी मित्र असलेले खान व तोरस्कर हे निवडणुकीच्या मैदानात मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघांना नामोहरम करणाऱ्या या दोन मित्रांमधील या राजकीय लढतीत कोण विजयी ठरतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

येथील ग्रामपंचायतीची लढत प्रतिष्ठेची होणार आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या साईप्रसाद काणेकर, डॅनी आल्मेडा यांनी, भाजपच्या संतोष सावंत यांनी तर कॉंग्रेसचे श्रीप्रसाद गोवेकर यांनी माघार घेतल्याने शहरात प्रामुख्याने पक्षीय पातळीवर विचार करता दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

विद्यार्थी दशेपासून दोघांची घट्ट मैत्री

अपक्ष उमेदवार साईप्रसाद कल्याणकर हे देखील रिंगणात आहेत. भाजपचे खान व शिवसेनेचे तोरस्कर हे समवयस्क आहेत. विद्यार्थी दशेपासून दोघांची घट्ट मैत्री आहे. क्रिकेटच्या मैदानात तर दोघांना द्रविड - लक्ष्मण या जोडगोळीप्रमाणे ओळखत.

दोघांचेही शिक्षण बांद्यात 

दोघांचेही शिक्षण बांद्यात झाल्याने दोघांची मैत्री अभेद्य होती. योगायोग म्हणजे राजकारणातील दोघांची एन्ट्री देखील 2017 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत झाली. दोघांनी आपल्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक लढवत समोरील मातब्बर उमेदवारांचा पराभव केला होता. दोघांनी आपापल्या प्रभागात विजय मिळवत पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत प्रवेश केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या समाजकार्यास सुरुवात झाली. 

सर्वपक्षीयांनी एकत्रित येत निवडणूक लढविली 

भाजपची 20 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित येत निवडणूक लढविली होती. त्यामध्ये शिवसेनेने 6 जागी तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने 5 जागी विजय मिळविला होता. सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत स्वाभिमानाचे उमेदवार गजानन गायतोंडे यांचा भाजपचे उमेदवार मंदार कल्याणकर यांनी पराभव केला. त्यावेळी उपसरपंच पदावर शिवसेनेने दावा केला होता. या पदासाठी शिवसेनेने मकरंद तोरस्कर यांना पुढे केले होते. मात्र, ऐनवेळी भाजपने खेळी करत स्वाभिमानाला पाठिंबा दिल्याने अक्रम खान हे उपसरपंचपदी विराजमान झालेत.

मैत्रीत दुरावा निर्माण

उपसरपंचपदावरून या दोन मित्रात झालेले कुरघोडीचे राजकारण संपूर्ण शहराने पाहिले. येथूनच त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. ग्रामपंचायत सदस्य निवडणूक एकत्रित लढलेले खान व तोरस्कर सरपंचपद पोटनिवडणूकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर आखाड्यात आहेत. शहरातील 5 हजार 320 मतदार बांद्याचा सरपंच निवडणार आहेत. 
 
मकरंद तोरस्कर ( शिवसेना ) : 

जमेच्या बाजू 

* शहरातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात योगदान 
* युवकांची फळी 
* माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शहरातील विकासकामांचा 
सेनेचे उमेदवार म्हणून मिळणारा फायदा. 

कमकुवत बाजू :

* शिवसेनेचे शहरात कमकुवत संघटन. 
* जनसंपर्काचा अभाव. 
 
अक्रम खान ( भाजप ) :

जमेच्या बाजू :

* भाजपचे शहरात मजबूत संघटन 
* स्वाभिमानाच्या विलीनीकरणामुळे वाढलेली ताकद 
* भाजपकडे गेली 23 वर्षे असलेले सरपंचपद 
* समाजातील सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध 
* दांडगा जनसंपर्क, अडीअडचणीत धावून जाण्याची वृत्ती. 

कमकुवत बाजू : 
* दिर्घकाळ असलेल्या सत्तेमुळे अपेक्षांचे ओझे 
* पक्षाच्या स्थानिक संघटनेत असलेले गटा-तटाचे राजकारण.  
 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com