राणेंची आजची रात्र तुरुंगात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

कणकवली - महामार्ग उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की, त्यांच्या अंगावर चिखल ओतणे, पुलाला बांधून ठेवणे याप्रकरणी आमदार नीतेश राणेंसह अन्य तिघांना कणकवली पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. अन्य 15 जणांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​

कणकवली - महामार्ग उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की, त्यांच्या अंगावर चिखल ओतणे, पुलाला बांधून ठेवणे याप्रकरणी आमदार नीतेश राणेंसह अन्य तिघांना कणकवली पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. अन्य 15 जणांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

दरम्यान, तत्पूर्वी नगराध्यक्ष समीर नलावडेसह 18 जणांवर स्वाभिमान कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर स्वाभिमान कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. यात आमदार राणे पोलिस ठाण्यात हजर झाले. या वेळी स्वाभिमान कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला घेराओ घातला होता. 

सायंकाळी सहाच्या सुमारास आमदार राणे कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी नामांकित मोरे आणि पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी फक्त राणे यांनाच केबिनमध्ये घेतले आणि इतर कार्यकर्त्यांना बाहेर थांबवले. हा प्रकार राणेंच्या लक्षात येताच, त्यांनी आम्ही जनतेच्या प्रश्‍नासाठी लढायचे, अंगावर गुन्हे घ्यायचे आणि तुम्ही बाहेर थांबून मजा बघताय का? असे कार्यकर्त्यांना सुनावले. त्यानंतर स्वाभिमानचे कार्यकर्ते पोलिस बंदोबस्त तोडून पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये घुसले आणि पोलिस उपविभागीय अधिकारी मोरे यांच्याशी हुज्जत घातली तसेच सुमारे अर्धातास कार्यकर्ते आणि पोलिस यांची बाचाबाची सुरू होती.

दरम्यान आमदार राणे यांनी गुन्हा नोंद झाल्या प्रकरणी अधिकाऱ्यांना खडसावले. लोकशाहीमध्ये आंदोलने करायची नाहीत का? जनतेचा जीव धोक्‍यात असेल तर रस्त्यावर उतरायचे नाही का? जनतेच्या प्रश्‍नासाठी आम्ही आंदोलन केले आणि त्यासाठी गुन्हा दाखल करत असाल तर माझा राजीनामा घ्या. आमदार जनतेसाठी असतो आणि जनतेचे प्रश्‍न सुटत नसतील आमदारकीचा काय उपयोग असे राणे म्हणाले. तर पावसाळा संपेपर्यंत महामार्ग सुस्थिती राहील याची ग्वाही पोलिस प्रशासनाने द्यावी आम्ही आंदोलन करत नाही असे म्हणणे कार्यकर्त्यांनी मांडले.

आमदार राणे यांनी महामार्ग सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला. जोपर्यंत महामार्ग सुस्थितीत होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलने करणार तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा असेही राणे असा इशारा देखील श्री.राणे यांनी यावेळी दिला. सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात स्वाभिमान कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांत वादंग सुुरू होता. अनेक आमदार राणेंसह प्रमुख कार्यकर्त्यांनी अटक करून घेण्याचे घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून अटकेची कारवाई सुरू करण्यात आली.

महामार्ग उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत आणि शिवसुंदर देसाई यांना दुपारीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर मामा हळदिवे, निखिल आचरेकर, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री आदींसह अन्य कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई सुरू करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR has been registered against Congress MLA Nitesh Narayan Rane