आंबडगावात बागेला आग; लाखोंची हानी

आंबडगाव - येथील काजूच्या बागेला आग लागून झालेले नुकसान.
आंबडगाव - येथील काजूच्या बागेला आग लागून झालेले नुकसान.

दोडामार्ग - आंबडगाव येथील काजूच्या बागेला आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काजूच्या बागेजवळच्या मैदानात दारू पिण्यासाठी बसलेल्या युवकांकडून आग लावली गेल्याचा संशय आहे. या प्रकरणी आंबडगाव येथील धर्मा अर्जुन साटेलकर यांनी तक्रार दिल्यावरून तेथील भरडवाडीमध्ये राहणाऱ्या अभिनाथ आपा गवस या युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले होते.

आंबडगाव साटेलकरवाडी व भरडवाडीदरम्यानची कित्येक एकर क्षेत्रांतील शेकडो काजूची कलमे व काजूची जुनी झाडे आगीमुळे होरपळली. अनेक काजूची झाडे जळून खाक झाली. सध्या काजूचा हंगाम ऐन बहरात आहे. काजूला दरही चांगला आहे. काजूचा दर प्रतिकिलो १६५ ते १७० आहे. साहजिकच काजूबिया विकून घरसंसार चालविण्याचे स्वप्न शेतकरी पाहतो; पण काही बेजबाबदार युवकांमुळे त्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होण्याची वेळ येते.

आंबडगाव परिसरात होळी पौर्णिमेच्या दुपारी काही युवक तेथील काजूच्या बागेत बसले होते. गंमत म्हणून त्यांनी पेटवलेल्या काडीमुळे गवत पेटले व आग पुढे पुढे पसरत गेली. काही क्षणात आगीने वणव्याचे रूप धारण केले. आग भडकली आणि आजूबाजूच्या काजूच्या बागेला तिने कवेत घेतले. जवळच्या साटेलकरवाडीतील ग्रामस्थांनी, महिलांनी व काही शेतकऱ्यांनी ती आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत लाखोंचे नुकसान झाले होते.

त्यांना अश्रू अनावर
या आगीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांतील पार्वती साळगावकर यांची रोजीरोटीच आगीमुळे नाहीशी झाली. साठी ओलांडलेल्या साळगावकर यांच्या वाट्याला या वर्षी बाग आली होती. यंदा काजू चांगला होता, शिवाय दरही बरा होता. त्यामुळे यावर्षीची आपली ‘वर्सल’ समाधान आणेल, अशी आशा होती; पण त्यांच्या या आशेवर पाणी पडले. त्यामुळे त्या भावविवश झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com