अग्नीशमन उभारणीचा तिढा अखेर सुटला

अमोल टेंबकर
बुधवार, 17 मे 2017

सावंतवाडी - गेली अनेक वर्षे लाल फितीत अडकलेल्या येथील अग्नीशमन यंत्रणेचा तिढा सुटला आहे. यासाठी प्रस्तावित असलेली राष्ट्रीय महामार्ग खात्याची जागा पालिकेच्या नावावर होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे आता येत्या काही दिवसात ही इमारत उभारण्यास सुरवात होणार आहे. या प्रक्रियेला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दुजोरा दिला.

सावंतवाडी - गेली अनेक वर्षे लाल फितीत अडकलेल्या येथील अग्नीशमन यंत्रणेचा तिढा सुटला आहे. यासाठी प्रस्तावित असलेली राष्ट्रीय महामार्ग खात्याची जागा पालिकेच्या नावावर होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे आता येत्या काही दिवसात ही इमारत उभारण्यास सुरवात होणार आहे. या प्रक्रियेला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दुजोरा दिला.

अनेक वर्षे हा प्रश्‍न प्रलंबित होता; मात्र आता तो मार्गी लागणार आहे. पालिकेचे नाव सात-बाऱ्यावर आल्यानंतर पुढील काम सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. येथील पालिकेच्या आधुनिक अग्नीशमन यंत्रणेसाठी अडीच कोटीचा निधी आठ वर्षापुर्वी मंजूर केला होता; मात्र या कार्यालयासाठी प्रस्तावित असलेली पालिकेच्या बाजूची जागा ही राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या ताब्यात असल्यामुळे अनेक वर्षे त्याचा पाठपुरावा करावा लागला होता. त्या ठिकाणी कार्यरत असलेले राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय आता कसाल येथे हलविण्यात आले आहे.

ही प्रक्रिया वर्षभरापुर्वी केली आहे. त्यानंतर ही जागा पालिकेच्या मालकीची असणे आवश्‍यक असल्यामुळे अन्य प्रक्रिया पुर्ण करण्याच्या हालचाली सुरू होत्या; मात्र मंत्रालय स्तरावर अडचणी येत असल्यामुळे हे काम अनेक दिवस रेंगाळले होते.

उपलब्ध माहितीनुसार त्या जागेचा सातबारा पालिकेच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तशा सुचना तहसिलदार सतिश कदम यांनी तलाठ्यांना दिल्याचे समजते.

याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रक्रियेबाबत माहिती दिली. आठ वर्षापुर्वी शहरात आधुनिक अग्नीशमन यंत्रणा उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता; मात्र जागेअभावी पुढील प्रक्रिया ठप्प झाली होती.

‘त्या’ जागेवर महामार्गाचे अतिक्रण
संबधित इमारत आणि जागा ही आयटीआयच्या मालकीची होती. तसा सातबारात उल्लेख आहे; मात्र त्या जागेवर राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण केले होते अशी माहीती आता कागदपत्राच्या माध्यमातून उघड झाली आहे. त्यानुसार ती जागा आयटीआयकडून पालिकेच्या नावावर वर्ग करण्यात आली आहे. त्यासाठी सरकारी दराप्रमाणे रक्कम भरणा केली आहे.
 

गेले अनेक दिवस हा प्रश्‍न रेंगाळला होता. या ठिकाणी आता अग्निशमन केंद्र उभे राहणार आहे. यासाठी पालिकेकडून शासनाला २९ लाख रुपये जागेसाठी भरण्यात आले आहेत. ती जागा ९ गुंठे आहे. आधुनिक यंत्रणा उभी राहिल्यामुळे गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. याचबरोबर शहरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत चांगली सेवा मिळणार आहे.
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष-सावंतवाडी

Web Title: fire brigade issue solve