गवताची गरज कमी; वणव्यांचे प्रमाण वाढले

गवताची गरज कमी; वणव्यांचे प्रमाण वाढले

रत्नागिरी - गाव व जंगलांमध्ये अलीकडे वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वणवे रोखण्याकरिता राज्य शासनाने वणवामुक्त गाव योजना हाती घेण्याची गरज आहे. आमचा गाव, वणवामुक्त गावांतर्गत फलक जागृती, स्वतंत्र ग्रामसभा, त्यात वणवा रोखणे, वृक्षवल्ली अभियान, वृक्षसंवर्धन याबाबत मार्गदर्शन, त्यासाठी कृती दल स्थापना, स्थानिक युवकांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण, वणवाविरोधी सशस्त्र पथक आदी पर्याय वापरता येऊ शकतात, अशी माहिती निसर्गमित्र धीरज वाटेकर यांनी दिली.

प्रसंगी कायद्याचा, विधायक कामासाठी बळाचा वापर करून वणव्याचा कायमचा बंदोबस्त करायला हवा, अशी आग्रही सूचना त्यांनी केली. गेल्या १५ दिवसांत चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्‍यात अनेक डोंगरांतून वणवे गेलेले व त्यामुळे दुसऱ्या दिवशी तो परिसर होरपळलेला आढळून आला. त्याबाबत बोलताना वाटेकर म्हणाले, की वनांचे महत्त्व, वणव्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम लोकांना पटवून द्यावे लागतील. त्यातूनच हे प्रकार थोपवले जाऊ शकतात. कृती आराखड्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर २०१६ च्या पत्रानुसार २९ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.

राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीच्या अहवालानुसार २०१५ मध्ये १५ हजार ९३७ व २०१६ मध्ये २४ हजार ८१७ वणवे लागले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याची सूचना समितीने केली आहे. जंगलमाफिया मुद्दाम आग लावतात आणि त्या विझविल्यानंतर होरपळलेल्या झाडांचा लिलाव करतात. वनातून जाताना पेटती सिगारेट फेकणे, मशाल घेऊन जाणे, कॅम्पवरील आग तशीच सोडून जाणे, शेतीबांधावरील लावलेली आग यामुळे वणवे लागण्याचे प्रमाण वाढते. वणव्यासंदर्भात वन खात्याकडे आग विझवणारी व नियंत्रणात आणणारी कोणतीही अद्ययावत यंत्रणा नाही. आगीचा इशारा देणारे वायरलेस सेन्सर्सचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळवली जाऊ शकते. आग लागू नये म्हणून जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझवण्यासाठी झाडाच्या फांद्या या पारंपरिक पद्धतीवर भारतीय वन खात्याची मदार आजही आहे.
 

गवताची मागणी घटली...
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. हे गवत पूर्वी गुरांच्या चाऱ्यासाठी वापरत असत. याच गवताच्या माध्यमातून चार पैसे मिळवलेही जायचे. गवताची एक वरंड ३० ते ३५ रुपयांना विकली जायची. परंतु पशुपालन कमी झाल्याने आणि गवताला मागणीच नसल्याने वणवे जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com