
शिकार अंगाशी; हळदीचे नेरूर दुकानवाडमध्ये घटना
कुडाळ (सिंधुदुर्ग) : बिगरपरवाना बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने घराशेजारील जंगलात गेलेल्या युवराज वारंग (वय १८) याचा बंदुकीची गोळी लागून जागीच मृत्यू झाला, अशी माहिती येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. ही घटना हळदीचे नेरूर दुकानवाड येथे आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली.
श्री. कोरे यांनी सांगितले की, दुपारी युवराज घराशेजारील जंगलात बिगरपरवाना बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने गेला होता. काही वेळाने मोठ्याने बंदुकीच्या गोळीचा आवाज झाला म्हणून घरातील धावत गेले असता युवराज जमिनीवर पडलेल्या स्थितीत होता. बाजूला बंदूक पडलेली होती. जवळून पाहिले असता युवराजच्या छातीत सिंगल बार बंदुकीची गोळी लागल्याचे दिसून आले व त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती त्याच्या काकाने दिली.
हेही वाचा- वारांगनांसाठी राज्य शासनाचा मोठा दिलासा
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. युवराज एकटाच गेला होता की, त्याच्या सोबत अन्य कोण गेले होते, याचाही तपास केला जाणार असल्याची माहिती निरीक्षक कोरे यांनी दिली.
संपादन- अर्चना बनगे