प्रथम मेडिकल कौन्सिलची मान्यता घ्या, मग पेढे भरवाः राजन तेली 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

बांदा-संकेश्‍वर हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून नेण्याचा घाट घातला जात असताना या शहराला आता वाली आहे की नाही असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित करत आमदार केसरकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. 

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज आले तर आम्ही त्याचे स्वागतच करू; मात्र प्रत्यक्षात त्यासाठी आवश्‍यक असलेली मेडिकल कौन्सिलची मान्यता नसतानाही सत्ताधाऱ्यांनी येथील जनतेला खोटी आश्‍वासने देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळू नये. त्यामुळे आधी मेडिकल कौन्सिलची मान्यता मिळवा आणि नंतरच एकमेकांना पेढे भरावा, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केली. 

बांदा-संकेश्‍वर हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून नेण्याचा घाट घातला जात असताना या शहराला आता वाली आहे की नाही असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित करत आमदार केसरकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. 

येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, तालुका सरचिटणीस प्रमोद गावडे, मधुकर देसाई, माजी सभापती रविद्र मडगांवकर आदी उपस्थित होते.

श्री. तेली पुढे म्हणाले, ""जिल्ह्यातील आमदार-खासदार पालकमंत्री मेडिकल कॉलेजवरून एकमेकांना पेढे भरवत आहेत; मात्र मेडिकल कॉलेजवरून येथील जनतेची धूळफेक न करता त्यासाठी आवश्‍यक असलेली मेडिकल कौन्सिलची मान्यता आधी मिळवावी आणि नंतरच मेडिकल कॉलेजबाबत घोषणा करावी. जिल्ह्याला मेडिकल कॉलेजची आवश्‍यकता आहे. ते झाले तर आम्ही त्याचे स्वागतच करू. गेली कित्येक वर्षे येथील आरोग्य यंत्रणा कोलमडलेली असताना आतातरी सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळू नये. कुडाळ येथील महिला हॉस्पिटलचे काम अर्धवट आहे. असे असताना येथील जनतेला सत्ताधारी मेडिकल कॉलेजवरून खोटी आश्‍वासने देत आहेत. राणेंच्या मेडिकल कॉलेजसाठी 301 घाटांचा झालेला तो करार त्यांचे हॉस्पिटल होण्याआधी झालेला होता. त्यामुळे जनतेला खोटी माहिती देऊन उगाच राणेंच्या मेडिकल कॉलेजची बदनामी नको.'' 

महामार्गाच्या प्रश्‍नावर मौन का ? 
सावंतवाडी शहराला कोणीच वारी उरला नाही, अशी परिस्थिती आहे. शहरातून जाणारा संकेश्‍वर बांदा हा महामार्ग बावळटमार्गे बांद्याला जोडण्याचा घाट सुरू आहे; मात्र यावर कोणीच बोलत नाही. चांदा ते बांदा ही महत्वकांक्षी योजनाही सुरू करण्याबाबत काहीच हालचाल होत नाही, असे सांगून त्यांनी आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता टीका केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Get Approval Of Medical Council Rajan Teli Comment