खुशखबर ; कोकणात घरकुलांचा पहिला हप्ता खात्यावर जमा

first installment deposited on account in oros sindhudurg
first installment deposited on account in oros sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) : महा आवास अभियान अंतर्गत आतापर्यंत 793 घरकुलांना मंजूरी दिली आहे. त्यातील 729 घरकुलांना पहिला हप्ता वितरित केला आहे. प्रत्येक घराला 15 हजार रुपये याप्रमाणे 1 कोटी 9 लाख 35 हजार रुपये एवढी रक्कम वितरित केले आहेत. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार महा आवास अभियान अंतर्गत जिल्ह्यात 20 डिसेंबरला 'पहिला हप्ता वितरण दिन' साजरा करण्यात आला. या अनुषंगाने त्यावेळी जिल्ह्यातील मंजूर 336 घरकुलांपैकी 222 घरकुलाना पहिला हप्ता सोडला होता. त्यानंतर आतापर्यंत एकूण 793 घरकुलाना मंजूरी दिली होती. त्यातील आतापर्यंत 729 घरकुलांना पहिला 15 हजार रूपयांचा हप्ता सोडलेला आहे. 

महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी घरे 2022 हे धोरण स्वीकारले असून राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधत 20 नोव्हेंबरला 'महा आवास अभियान-ग्रामीण' या नवीन अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केला. या अभियानात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल कामगार बांधकाम आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमानता व गुणवत्ता 2020-21 या आर्थिक वर्षात आणण्यात येणार आहे. 

या महा आवास अभियान अंतर्गत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 15 डिसेंबर हा दिवस राज्यात 'घरकुल मंजूरी दिन' म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले होते. 20 डिसेंबर 'पहिला हप्ता वितरण दिन' साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला हप्ता दिन साजरा केला होता. यानिमित्त मंजूरी दिलेल्या प्रस्तावांना पहिला हप्ता वितरण करण्यात आला. शासनाच्या घरकुल योजनेसाठी एकूण एक लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते. ही रक्कम एकूण चार टप्प्यात दिली जाते. त्यातील पहिला टप्पा हा 15 हजार रूपयांचा असतो. त्यानुसार ही रक्कम आतापर्यंत 729 घरकुल लाभार्थ्यांना वळती केली आहे. 

सर्वांनी पुढाकार घ्यावा 

संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येये मधील क्रमांक 11 नुसार किफायतशीर गृहनिर्माण क्षेत्राचा विकास झाल्यास एकूण मानवी विकासातील 17 पैकी 14 निर्देशावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. यासाठी घरकुलांच्या कामांची प्रगती फक्त संख्यात्मक न राहता गुणात्मक रहावी. नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून लाभार्थ्यांना सर्व सुविधायुक्त असे घरकुल उपलब्ध करून द्यावे. नैसर्गिक आपत्तीस सक्षमपणे सामोरे जाणारे घरकुल बांधण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ध्येय 'महा आवास अभियान-ग्रामीण' सुरु करण्यामागे शासनाचे आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com