दामले विद्यालय बनणार पहिले इंटरनॅशनल स्कूल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मार्च 2019

रत्नागिरी - नगरपालिका शाळा क्रमांक 15 तथा दामले विद्यालयाला पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र आंतररराष्ट्रीय शिक्षण मंडळाची (एमआयईबी) अस्थायी संलग्नता प्राप्त झाली. अशी मान्यता मिळवणारे हे जिल्ह्यातील पहिले मराठी माध्यमाचे इंटरनॅशनल स्कूल आहे.

रत्नागिरी - नगरपालिका शाळा क्रमांक 15 तथा दामले विद्यालयाला पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र आंतररराष्ट्रीय शिक्षण मंडळाची (एमआयईबी) अस्थायी संलग्नता प्राप्त झाली. अशी मान्यता मिळवणारे हे जिल्ह्यातील पहिले मराठी माध्यमाचे इंटरनॅशनल स्कूल आहे.

शाळेच्या शताब्दी वर्षात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सध्या पालकांचा इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई अभ्यासक्रमाकडे असणारा ओढा वाढला आहे. त्यामुळे अशा पालकांना मातृभाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर 13 ओजस शाळांची निवड करण्यात आली आहे. 100 तेजस शाळांची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सर्व निकष दामले विद्यालयाने पूर्ण केले. राज्यस्तरीय मूल्यांकन समितीद्वारे अस्थायी संलग्नतेचे पत्र मिळाले आहे.

पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शाळेत पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या वर्गांना हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली. पाचवीच्या पुढील वर्गांना अभ्यासक्रम तयार होईपर्यंत शासनाचा अभ्यासक्रम सुरू राहील. टप्याटप्याने या शाळेत दहावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जातील.

विद्यालयाने आतापर्यंत गुणवत्ता कायम टिकवली आहे. शिष्यवत्ती परीक्षेत 200 हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही शाळा अग्रेसर आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शाळेत जास्त असूनही तज्ज्ञ आणि मेहनती शिक्षकांमुळे शाळेने आपली गुणवत्ता कायम राखली आहे.

""पालिकेचे चांगले सहकार्य सातत्याने लाभते. कायम शाळेच्या विकासासाठी प्रयत्नशील पालक, मेहनती आणि सृजनशील शिक्षक आणि गुणी विद्यार्थी यांचा सुंदर मिलाफ जुळल्यानेच अस्थायी मान्यता मिळाली. आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिकता येईल. गुणवत्ता टिकविण्यासाठी कायम प्रयत्नशील आहोत.''

- प्रकाश जाधव, मुख्याध्यापक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First International School to become Damle Vidyalaya