मत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान विद्यापीठास संलग्न करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे. मत्स्य व समुद्र विज्ञान विद्यापीठ व्हावे, अशी मागणी जोर धरत असताना याचिकेने त्यामध्ये खो बसण्याची शक्‍यता आहे. 

दापोली कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना मत्स्यविज्ञानसंबंधी पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या 18 वर्षांत पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्‍टरेट मिळविलेल्या अंदाजे हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य या याचिकेशी निगडित आहे. 

रियाज हाफिज बेग व अन्य यांनी याचिका दाखल केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पशूविज्ञान विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ व मत्स्य महाविद्यालयाला प्रतिवादी बनवले आहे. नोटिफिकेशन स्थगित करावे, अशी मागणीही याचिकेत केली आहे. 

1998 मध्ये पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुरात अस्तित्वात आले. त्या वेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र व रत्नागिरीतील मत्स्य विज्ञान महाविद्यालय या विद्यापीठाचा जोडण्याचा निर्णय झाला. त्याला भरपूर विरोध केल्याने 2000 मध्ये महाराष्ट्र शासनाने नोटिफिकेशन काढून मत्स्य महाविद्यालय दापोलीच्या कृषी विद्यापीठास संलग्न ठेवण्याचा निर्णय झाला. चार महिन्यांपूर्वी मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला.

त्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कृषिमंत्री महादेव जानकर यांच्याशी चर्चा करून मत्स्य महाविद्यालय कृषी विद्यापीठाशीच संलग्न राहील, असे स्पष्ट केले होते. तसेच मत्स्य महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेतही अडथळे आले. त्या वेळी आमदार संजय केळकर यांनी लक्ष घालून हा प्रश्‍न सोडवला होता. 

रत्नागिरी, नागपूर आणि उद्‌गीर येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालये एकत्र करून कोकणात स्वतंत्र मत्स्य व समुद्र विज्ञान विद्यापीठ व्हावे, अशी कोकणवासीयांची मागणी आहे. त्यातून नवीन अभ्यासक्रम, संशोधन होऊन पूर्ण क्षमतेने मत्स्यव्यवसाय वाढीला लागेल. रोजगाराच्या संधी वाढतील.
- अॅड. विलास पाटणे,
रत्नागिरी 

Web Title: Fisheries college affiliate Petition in High Court