गोवळकोट रोड परिसरात मासळी विक्री तेजीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

ताजी मच्छी असल्याचे सांगून शहरातील मासळी विक्रेते आठ दिवसांपूर्वीची मच्छी ग्राहकांच्या माथी मारतात. त्याच दरात आम्हाला गोवळकोट रोड परिसरात ताजी मासळी मिळते. गोवळकोट परिसरातील विक्रेत्यांकडून ग्राहकांची एका प्रकार लूट केली जाते. मात्र, मच्छी ताजी असल्यामुळे कुणी तक्रार करत नाही. 
- शाहबाज गोठे, गोवळकोट रोड, चिपळूण

चिपळूण - शहराचे उपनगर असलेल्या गोवळकोट रोड परिसरात जागोजागी मासळी विक्री सुरू झाली आहे. रत्नागिरी, जयगड, गुहागर परिसरातील विक्रेते गोवळकोट रोड परिसरात येऊन मासळी विक्री करत आहेत. ताजी मासळी असल्याने जादा दराने मासळी विक्री सुरू आहे. येथे ग्राहकांची अक्षरशः लूट सुरू आहे.

शहरातील गुहागर नाका परिसरात ओली आणि सुकी मासळी विकली जाते. याच परिसरात पालिकेच्या मालकीचे मच्छी मार्केट आहे. काही वर्षांपासून त्याचे काम सुरू असल्यामुळे मच्छी मार्केटच्या बाहेर मासळी विक्री सुरू आहे. ओली व सुकी मासळीची खरेदी करण्यासाठी शहर व उपनगरातील लोक गुहागर नाका परिसरात येत. येथील विक्रेते फ्रीजरमध्ये ठेवलेली आठ दिवसांची मासळी ताजी असल्याचे सांगून ग्राहकांना जादा किमतीत विकतात. 

हा प्रकार शहरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुहागर नाका परिसरातील व्यावसायिकांकडे पाठ फिरवली. काही दिवसांपासून गोवळकोट रोड परिसरात मासळी विक्री जोमाने सुरू झाली आहे. जयगड, रत्नागिरी, गुहागर या भागातील मासळी विक्रेते गोवळकोट खाडीतून गोवळकोट रोड परिसरात येतात. येथील रस्त्यालगत ते मासळी बाजार मांडतात. विशेष म्हणजे किलोच्या दरात मासळी न विकता ती नगावर आणि वाट्यावर विकली जाते. तीन बांगडे शंभर रुपये, शंभर रुपयाला एक पापलेट, आठशे ते हजार रुपये दराने एक सुरमई आणि पाचशे रुपये नग दराने टोलकीची विक्री केली जाते. खेकडे आणि कोळंबीची वाट्यावर विक्री केली जाते. गोवळकोट रोड परिसरात मिळणारी मासळी ताजी असल्याचे लक्षात आल्यानंतर बहादूरशेख, कापसाळ, मिरजोळी, मुरादपूरसह शहरातील नागरिकही गोवळकोट भागात मासळी घेण्यासाठी जातात. सकाळी ८ ते दुपारी १२ या दरम्यान ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर विक्रेते मासळीचे दर वाढवितात. ताजी मासळी असल्यामुळे ग्राहक जादा दर देऊन मासळी खरेदी करीत आहेत. चार तासांत हजारो रुपयाची मासळी विकून हे व्यापारी परत जातात. शहरात बहादूरशेख नाका, खेर्डी आणि गुहागर नाका परिसरात मासळी विक्रीची मोठी केंद्रे आहेत. गोवळकोट रोड परिसरात नव्याने मासळी विक्री सुरू झाल्यापासून इतर ठिकाणच्या विक्रेत्यांवर मोठा परिणाम झाला आहे. 

Web Title: Fisheries sales