व्हाईट चिंगळ मिळाल्याने मच्छीमारांची झाली चंगळ, किलोला किती मिळाला दर वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द

ही माहिती मिळाल्यानंतर साखरतर, वरवडे, काळबादेवी, मिऱ्या येथील सुमारे शंभरहून अधिक गिलनेटधारक तिकडे वळले.

व्हाईट चिंगळ मिळाल्याने मच्छीमारांची झाली चंगळ, किलोला किती मिळाला दर वाचा सविस्तर

रत्नागिरी : हंगाम सुरू झाल्यानंतर समुद्र खवळलेलाच होता. त्यामुळे गिलनेटधारकांसह रापणकार मच्छीमारांना मासळी मिळत नव्हती. त्यामुळे मासेमारीवर अवलंबून असलेले छोटे मच्छीमार धास्तावलेले होते; परंतु वादळ शांत झाल्यानंतर रविवारी (ता. 30) बाप्पा पावला. रत्नागिरीतील शंभरहून अधिक मच्छीमारांना गणपतीपुळेजवळ व्हाईट चिंगळं जाळ्याला लागली. 25 ते 50 किलोपर्यंत चिंगळं मिळाल्याने मच्छीमार समाधानी आहेत. 

ऑगस्टपासून ट्रॉलिंग, गिलनेटसह होडक्‍याद्वारे मासेमारीला अधिकृत परवानगी मिळाली; परंतु पावसाळी वातावरण आणि अचानक आलेल्या वादळांमुळे समुद्र खवळलेलाच होता. नौका बुडण्याच्या भीतीने अनेक छोटे मच्छीमार समुद्रात जात नव्हते. गणेशोत्सव आला तरीही वातावरण निवळत नव्हते. समुद्र खवळल्यामुळे मासळीही मिळत नव्हती. गणपती बाप्पाच्या कृपेने रविवारी समुद्र शांत असल्याचा फायदा घेत स्वार झालेल्या छोट्या मच्छीमारांना गणपतीपुळेजवळ व्हाईट चिंगळं जाळ्यात सापडली. 

ही माहिती मिळाल्यानंतर साखरतर, वरवडे, काळबादेवी, मिऱ्या येथील सुमारे शंभरहून अधिक गिलनेटधारक तिकडे वळले. मच्छीमारांना हा चिंगळांचा प्रसाद मिळाला. व्हाईट चिंगळांचा आकार 4 ते 5 इंच इतका असून किलोचा दर 510 रुपये मिळत आहे. एका किलोत 30 ते 40 चिंगळं बसतात. यंदाच्या हंगामात एकाचवेळी मच्छीमारांना एवढ्या प्रमाणात मासळी मिळालेली नव्हती. सध्या ट्रॉलिंगला "चालू' चिंगळ मिळत असून किलोला 90 रुपये दर मिळत आहे. 

वादळ पथ्यावर 
वादळामुळे समुद्र खवळलेला होता. या परिस्थितीत मासळी प्रवाहाबरोबर पुढे सरकत राहते किंवा ती किनाऱ्याकडे वळते; मात्र हे वादळ छोट्या मच्छीमारांच्या पथ्यावर पडले. वादळ शांत झाल्याने मासळी किनारी भागाकडे वळल्याने व्हाईट चिंगळं मच्छीमारांच्या जाळ्यात सापडू लागल्याचा अंदाज मच्छीमारांनी व्यक्‍त केला आहे. 


यंदाच्या हंगामात चालू आणि टायनी चिंगळं मिळत होती. रविवारी व्हाईट चिंगळं मिळाली होती. बाजारात किलोचा दरही चांगला मिळाल्याने फायदा झाला. 

- श्रीदत्त भुते, मच्छीमार 

पर्ससिननेटचा हंमाग आजपासून
पर्ससिननेटद्वारे मासेमारीला मंगळवारपासून (ता. 1) प्रारंभ होत आहे. खलाशांच्या अडचणीवर मात करण्यासाठी या मच्छीमारांना कसरत करावी लागत आहे. काहींनी आधीच खलाशांना आणल्यामुळे 30 टक्‍के मच्छीमार समुद्रात जातील, असा अंदाज आहे. पर्ससिननेट मासेमारी सुरू झाल्यानंतर इतर मच्छीमारांना मासळी मिळत नाही. यामुळे मच्छीमारांमध्ये संघर्षाला सुरवात होते. 

संपादन ः विजय वेदपाठक