मिरकरवाड्यात ४४ हजार टनावर मत्स्योत्पादन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

रत्नागिरी - मिरकरवाडा हे सागरी मत्स्योत्पादनात कोकणातील सर्वाधिक उलाढाल असणारे बंदर आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मिरकरवाडा बंदरातून ४४ हजार ५१६ टन उत्पादन मिळाले. मुंबईसह ठाणे ते सिंधुदुर्गमधील वसई व वर्सोवा या बंदरात ४२ हजार टनांपर्यंतच मत्स्योत्पादन होते.

रत्नागिरी - मिरकरवाडा हे सागरी मत्स्योत्पादनात कोकणातील सर्वाधिक उलाढाल असणारे बंदर आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मिरकरवाडा बंदरातून ४४ हजार ५१६ टन उत्पादन मिळाले. मुंबईसह ठाणे ते सिंधुदुर्गमधील वसई व वर्सोवा या बंदरात ४२ हजार टनांपर्यंतच मत्स्योत्पादन होते. गेल्या आठ वर्षांत मिरकरवाडा बंदराने जिल्ह्यातील एकूण मत्स्योत्पादनाच्या निम्म्यापेक्षा अधिक वाटा उचलला असून, राज्याच्या तुलनेत उत्पादनाचा टक्का सर्वाधिक आहे.

मिरकरवाडा बंदरात २९७ ट्रॉिलंग, तर २३० गीलनेट, ३०४ पर्ससीन आणि ८७ बिगर यांत्रिकी नौका आहेत. २०१८-१९ मध्ये एक हजार ७४ नौकांच्या माध्यमातून मिरकरवाडा बंदरात मासेमारी झाली. या हंगामात सुरवात चांगली झाली होती; मात्र ऑक्‍टोबर महिन्यात वातावरण बदलले आणि काही दिवस मासेमारी ठप्प झाली. 

त्यानंतर ट्रीगर फिश मासा मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यामुळे चवदार मासळीचा तुटवडा जाणवू लागला. या परिस्थितीत हंगामाच्या अखेरपर्यंत मिरकरवाडा बंदरात ४४ हजार ५१६ टन मत्स्योत्पादनाची नोंद झाली. बुरोंडीत पाच हजार ८९० टन, दाभोळ १५ हजार ६६६ टन आणि रत्नागिरीतील इतर बंदरातून सात हजार ६६६ टन मत्स्योत्पादन आहे. इतर बंदरांच्या तुलनेत मिरकरवाडा येथे अधिक उत्पादनाची नोंद झाली आहे. २०१७ मध्ये ५३ टक्के इतका वाटा मिरकरवाड्यातून जिल्ह्याला दिला गेला होता. तो हळूहळू खाली आला आहे. 

पुरेशा सुविधांचा अभाव
जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन देणारे हे बंदर असले तरीही येथील मच्छिमारांना पुरेशा सुविधा मिळालेल्या नाही. बंदर विकासाच्या टप्पा दोनमधून निधी मंजूर आहे; मात्र त्याची कामे अद्यापही झालेली नाही. त्यात लिलाव गृह, मासळी हाताळणी केंद्र, बर्फ साठवण केंद्र यांचा समावेश आहे. सध्या प्राधिकरणाच्या जागेत लिलाव प्रक्रिया सुरू आहे. मिरकरवाडा बंदरात परराज्यातील नौकाही मासे उतरण्यासाठी येतात. सुविधा दिल्या गेल्या तर, देशातील मोठे बंदर म्हणून मिरकरवाडाचे नाव होईल. 

मत्स्य व्यवहाराची उलाढाल
वर्ष    मत्स्योत्पादन टन    टक्के
२००६-०७    ४२ हजार ०७३    ३८.५८ टक्के
२००७-०८    ३९ हजार ४५०    ४६.३६ टक्के
२००८-०९    ३० हजार ७१३    ४२.४७ टक्के
२००९-१०    २५ हजार ०००    ३३.२९ टक्के
२०१०-११    ५१ हजार २६१    ५३.६२ टक्के
२०११-१२    ४१ हजार ७४२    ४७.२३ टक्के
२०१२-१३    ३२ हजार ८६४    ३७.४७ टक्के
२०१३-१४    ४३ हजार ०८५    ३९. ३९ टक्के
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fishery production at Mirkarwada at 44 thousand tonnes