रत्नदुर्गजवळ मच्छीमारी नौका बुडाली;  एक खलाशी ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

रत्नागिरी - पावसाचा जोर कमी झाला असला तरीही वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे. नारळीपौर्णिमेच्या दिवशी पहाटेला मच्छीमारीसाठी बाहेर पडलेली "अलीना' मच्छीमारी नौका शहराजवळील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी बुडाली. खडकावर आपटून त्या नौकेला जलसमाधी मिळाली, त्यातील 5 बचावले. एक खलाशी बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मुरूगवाडा येथे सापडला. 

रत्नागिरी - पावसाचा जोर कमी झाला असला तरीही वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे. नारळीपौर्णिमेच्या दिवशी पहाटेला मच्छीमारीसाठी बाहेर पडलेली "अलीना' मच्छीमारी नौका शहराजवळील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी बुडाली. खडकावर आपटून त्या नौकेला जलसमाधी मिळाली, त्यातील 5 बचावले. एक खलाशी बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मुरूगवाडा येथे सापडला. 

नौकेवरील एक खलाशी रामचंद्र केशव पवार हे बेपत्ता झाले. वाचलेल्या खलाशांमध्ये रेबर उमर जांभारकर (वय 54, पडवे, राजापूर), विकास चौधरी (20), आसिफ जांभारकर (50, पडवे), मुश्‍ताक भाटकर आणि एक नेपाळी खलाशी यांचा समावेश आहे. नौका राजिवडा येथील रफीक फणसोपकर यांची आहे. गुरुवारी (ता. 15) पहाटे चार वाजता रत्नदुर्ग किल्ल्यासमोर ही नौका मासेमारी करत होती. किनाऱ्यापासून आठ ते दहा वावात मासेमारीसाठी जाळे टाकण्यात आले होते.

पौर्णिमेची भरती आणि पहाटेच्या सुमारास सुटलेले वारे यामुळे लाटांचा वेग वाढत होता. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे जाळे तुटले. ते सावरत असतानाच प्रवाहाबरोबर नौकेचा तोल जाऊ लागला आणि ती किनाऱ्याच्या दिशेने वाहून जाऊ लागली. रत्नदुर्ग किनाऱ्यावर मोठ मोठे खडक असल्यामुळे नौका त्यावर आपटू नये यासाठी इंजीन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले; पण दुर्दैव आडवं आले. नौका सुरू करण्यासाठी गेलेल्या तांडेलाच्या पदरी निराशा आली, इंजिनच सुरू होत नव्हते. नौका थांबविण्यासाठी खलाशांनी नांगरही टाकला, पण त्याचा दोरही तुटल्याने शेवटचे प्रयत्नही तोकडे पडले. काहीच जमत नसल्यामुळे नौकेवरील सहा खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या.

बंद पडलेली अलिना नौका किनाऱ्यावरील खडकावर आदळून चक्‍काचूर झाला. नौकेवरील पाच खलाशांनी त्याही परिस्थितीत पोहत पोहत किनारा गाठला. लाटांशी दोन हात करणारे तीन खलाशी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. कातळावर आपटून या बोटीचा चक्‍काचूर झाल्यामुळे 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मत्स्य विभागाकडून याचा पंचनामाही करण्यात आला आहे. 
 
मच्छीमारांना आवाहन 
नारळीपौर्णिमा झाली असली तरीही अजून समुद्रातील पाण्याला करंट आहे. लाटा उसळलेल्या आहेत. वादळी स्थिती आहे. त्यामुळे मच्छीमारांनी सुरक्षितता बाळगावी अशा सूचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fishing Boat accident one sailor Dead