यंदा मासेमारी तोट्याच्या जाळ्यात

fishing business face problems in ratnagiri 800 boats stand in ports
fishing business face problems in ratnagiri 800 boats stand in ports

हर्णै (रत्नागिरी) : या वर्षी मच्छीमार दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडला आहे. दररोज बंपर काळात दोन कोटींची उलाढाल होणाऱ्या येथील बंदरात ठप्प झाल्यात जमा आहे. या वर्षीची संक्रांत मच्छीमारांवर आणि मासेमारी व्यवसायावर आल्याचा अनुभव येथील मच्छीमार घेत आहेत. सुमारे ८०० नौका दर्याऐवजी आंजर्ले खाडी आणि हर्णै बंदरात उभ्या आहेत.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसापासून ते आताच्या खराब हवामानापर्यंत मच्छीमार निसर्गाचा कोपच अनुभवत आहेत. यामुळे या आधी कधी नव्हे एवढा मच्छीमार हतबल झाला असून या व्यवसायावर अवलंबून सुमारे दोन हजार कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे. सरकारने मासळी दुष्कार जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. गेले २० ते २५ दिवस हर्णै बंदरामध्ये मासेमारीच बंद झाली आहे. किमान १५० ते २०० नौका हर्णै बंदरात उभ्या आहेत आणि उर्वरित ५०० ते ६०० नौका आंजर्ले खाडीत जाऊन थांबल्या आहेत.

नोव्हेंबर २०२० मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तेव्हापासून मासळीची आवकच कमी झाली आणि आता तर मासेमारीला जाऊन मासळी मिळतच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे  २०० नौका हर्णै बंदरात उभ्या आहेत. उर्वरित ५०० ते ६०० नौका आंजर्ले खाडीत जाऊन थांबल्या आहेत. ८ ते १० दिवसांपूर्वी उत्तरेकडील जोरदार वारे चालूच होते. वातावरणात अचानक होणारे बदल, केरळ, कर्नाटक आणि गुजरातच्या फास्टर इंजिन असलेल्या नौकांचे अतिक्रमण यामुळे पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळणं कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे बंदरामध्ये सकाळ-संध्याकाळी चालणारा लिलाव थंडावला आहे.

याबाबत स्थानिक मच्छीमारांनी सांगितले की, २० ते २५ दिवसांपूर्वी सहा सिलेंडरच्या नौका डिझेल भरून मासेमारीला जात होत्या तेव्हा काहीच मासळी मिळत नव्हती. रोजचा होणारा सर्व खर्च हा नौकामालकाच्या अंगावर पडू लागला. समुद्रात मासेमारीला जायचं आणि नुसतं डिझेल संपवून यायचं अस चाललं होतं. ही अवस्था सहा सिलेंडर ट्रॉलर नौकांची आहे परंतु दोन सिलेंडरच्या नौकांचीदेखील तशीच अवस्था आहे.

छोट्या नौकासुद्धा जाण्यास धजत नाहीत

ट्रॉलर मासेमारीकरिता ८ ते १० दिवसांकरिता जातात तर दोन सिलेंडरच्या नौका या ४ ते ५ दिवसांकरिता जातात. त्यामुळे सध्या छोट्या नौका मासेमारी गेल्या तरी त्यांनाही मिळणाऱ्या मासळीतून डिझेल खर्चदेखील सुटत नाही. त्यामुळे छोट्या नौकासुद्धा मासेमारीला जाण्यास धजत नाहीत. किमान ७०० ते ८०० नौकांनी मासेमारीस जाण्याचंच थांबवलं. परिणामी गेले २० ते २५ दिवस हर्णै बंदरामध्ये मासेमारीच बंद आहे. यामुळे हतबल झालेल्या मच्छीमारांनी समुद्राची पूजा केली आहे.

५० हजार कुटुंबे अवलंबून

हर्णै बंदरातील मासेमारी उद्योगावर किमान ५० हजार कुटुंबे अवलंबून आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये अशी अवस्था निर्माण झाली होती, तसेच त्या वेळी फास्टर नौकांचे अतिक्रमण आणि कोरोनामुळे चालू झालेले लॉकडाउन अशा दुहेरी संकटामुळे मासळी उद्योग २२ मार्च २०२० पासून बंदच झाला. बहुतांशी मच्छीमारांनी फेब्रुवारीतच आपल्या नौका उद्योग बंद करून किनाऱ्यावर घेतल्या होत्या.

या वर्षी दरामध्ये ५० टक्‍क्‍यांची घट

गेल्या वर्षीच्या मासळीच्या दराच्या तुलनेत यावर्षी दरामध्ये ५० टक्‍क्‍यांची घट दिसून येत आहे तसेच डिझेलचे दरही किमान २० रुपयांनी वाढले. परंतु आमचा डिझेल परतावा अजूनही सरकारच वापरत आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान झाले की सरकार लगेचच पॅकेज मंजूर करते पण मच्छीमारांकडे मात्र दुर्लक्षच होत आहे. २०१६ पासूनचा परतावा मिळलेलाच नाही. शेतकऱ्यांसारख्या आत्महत्या करायच्या का? याचीच सरकार वाट पाहत आहे का? असे सवाल मच्छीमार विचारत आहेत.


‘बंपर‘ काळात रोज २ कोटींची उलाढाल

या बंदरात बंपर मासळी आवकीच्यावेळी दोन कोटींची उलाढाल होते, पण तीच उलाढाल ठप्प झाली आहे. पहिले दोन महिने वादळातच गेले. नंतर कुठे मासळी मिळायला सुरवात झाली होती, तर लगेचच मासळी मिळणं मुश्‍किल होऊ लागलं. मच्छीमारांना स्वतःला खायलाही मासळी मिळत नाहीत. त्यामुळेच सर्व नौका बंदरात आंजर्ले खाडीत, दिघी, जयगड खाडीत नांगर टाकून उभ्या आहेत. आजच्या घडीला १५०० मासेमारी नौका थांबल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत गेल्या महिन्याभरात ५० ते ६० कोटींचे नुकसान झालं आहे.

सर्वच उद्योग गारठले

मासळी दुष्काळामुळे बंदरावर अवलंबून असणारे सर्वच उद्योग गारठले आहेत. जानेवारी महिन्यातच सगळ्या उद्योगांवर संक्रांतच आली आहे. वडापाव, चहा-नाष्टाचे हातगाडीवाले, किराणा दुकान, डिझेल विक्री, भाजी विक्रेते, खरेदी केलेली मच्छी थर्मोकॉलच्या बॉक्‍समध्ये भरून नेली जाते ते बॉक्‍सविक्रेते, घरगुती समान विक्रीची छोटी दुकाने, छोटे छोटे कापड दुकान सर्वत्र मंदी आहे.

"गेल्या ३० वर्षांत माझ्या बर्फ विक्रीच्या उद्योगामध्ये आता एवढी कठीण परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. नोकरांचा पगार, मशिनरी मेंटेनन्स, कर्जाचे हप्ते, बर्फ खरेदी हे सर्व अंगावरच पडतंय. दररोज किमान ५ ते ६ टन बर्फ आम्ही आणतो. गेल्या महिन्याभरात कित्येकदा बर्फ वितळूनच गेला. तेही नुकसान सोसतोय. ९ बर्फ विक्रेते या बंदरात आहेत. माझंच स्वतःच किमान २ लाखापेक्षा जास्तच नुकसान झालं आहे. नौका मासेमारीला जातच नसल्यामुळे बर्फाचा खपच नाही. बर्फाची साठवणदेखील करता येत नाही. उधारीदेखील वसूल होत नाही. धंदाच नाही त्यामुळे उधारी देण्यास पैसे कोठून येणार?"

- सुरेश मोरे, बर्फ विक्रेते

"मच्छीमारांवरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे. ज्यांची कर्जे आहेत त्या बॅंकांनी तर खटल्याच्या नोटिसा पाठवून जप्तीच्या कारवाया करायला सुरवात केली आहे. त्यामुळे यापुढे सरकारनं वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा अधिवेशनामध्ये आंदोलन करून तिथेच आत्महत्या करू."

- गणेश चोगले, सदस्य, मच्छीमार संघटना

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com