मच्छीमारांमधील संघर्षाचे मत्स्य उद्योगावर सावट

राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016


पर्ससिननेटधारक घुसखोरी करीत असल्यामुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांच्या जाळ्याचा व्यास कमी असल्याने सरसकट मासेमारी होऊन नैसर्गिक समतोल बिघडण्याचे काम पर्ससिननेटधारक करीत आहेत.
- खलील वस्ता, मच्छीमार

रत्नागिरी ः कोकणाचा आर्थिक कणा असलेल्या मत्स्य उद्योगात पारंपरिक आणि पर्ससिननेटधारकांमधील संघर्ष आणि हवामानातील बदलामुळे व्यवसाय जिकिरीचा झाला आहे. सरकारने पारंपरिक मच्छीमारांसाठी 12 वाव सागरी क्षेत्र राखीव ठेवले, तर 12 वावाच्या बाहेर (खोल समुद्रात) पर्ससिनधारकांना मासेमारीला परवानगी दिली; परंतु तेथे धोका पत्करण्यापेक्षा राखीव क्षेत्रात घुसखोरी करून पर्ससिननेटधारक बेकायदा मासेमारी करीत आहेत. नियमबद्ध व आधुनिक पद्धतीने मासेमारी करून उत्पादन खेचण्याचा प्रयत्न हेच मच्छीमारांच्या अवनतीचे कारण ठरत आहे.

शिवसेना-भाजप युती सरकारने डॉ. सोमवंशी अहवाल स्वीकारल्यानंतर राज्यात मासेमारी बंदी घालण्यात आली. खलाशांना दिलेली उचल, डिझेल, खलाशी, तांडेल यांचे दररोजचे पगार असा खर्चही सुटू शकत नाही, यामुळे मच्छीमार मेटाकुटीला आला. जोड व्यवसायही कोलमडले. आंदोलने, रास्ता रोको, समुद्रातील निदर्शनाद्वारे बंदी उठवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. राजकीय नेत्यांनीही त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन-अडीच वर्षांनंतर विविध अटी घालून मासेमारीवरील बंदी उठवली; परंतु या अटींचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे.

बेकायदा मासेमारीला प्रतिबंध घालण्याची जबाबदारी सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयावर आली; परंतु तोकड्या सुविधांमुळे येथील मत्स्य विभाग कमी पडत आहे. त्यांनी पोलिसांची मदत घेऊन संयुक्त गस्त सुरू केली. मात्र तरीही अवैध मासेमारीला आळा घालण्यात यश आलेले नाही. पायाभूत सुविधा नसल्यामुळे बंदरांची अवस्थाही बिकट आहे.

पारंपरिक-पर्ससिन संघर्ष
अटींप्रमाणे पर्ससिननेटधारकांना खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणे शक्‍य नाही. त्यामुळे ते राखीव क्षेत्रात घुसतात. यामुळे पारंपरिक मच्छीमारांना अपेक्षित मासळी मिळत नाही. त्यातून पारंपरिक आणि पर्ससिननेटधारकांमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे.

जिल्ह्यातील मच्छीमारीचा ताळेबंद
- जिल्ह्यात वर्षाला 700 ते 800 कोटीं रुपयांची उलाढाल
- 85 हजार ते एक लाख टन मासळी उत्पादन
- 104 गावांतील 14 हजार 816 कुटुंबांचा व्यवसाय
- 67 हजार 615 जणांच्या उदरनिर्वाहाचे साधन
- 77 जिल्ह्यातील मच्छीमारी सहकारी संस्था
- 2 हजार 964 विविध प्रकारच्या मासेमारी नौका

सरकारने समुद्रातील हे नैसर्गिक चक्र सुरू राहावे यासाठी काही नियम-अटी घातल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. राखीव क्षेत्रामधील घुसखोरी रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीने आम्ही संयुक्त गस्त घालून यावर नियंत्रण ठेवत आहोत.
- एम.व्ही. भादुले,
सहायक मत्स्य आयुक्त, रत्नागिरी

पर्ससिननेटधारक घुसखोरी करीत असल्यामुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांच्या जाळ्याचा व्यास कमी असल्याने सरसकट मासेमारी होऊन नैसर्गिक समतोल बिघडण्याचे काम पर्ससिननेटधारक करीत आहेत.
- खलील वस्ता, मच्छीमार
 

Web Title: fishing business shadowed by fights