esakal | Chiplun Flood - महापुरामुळे चिपळूणवासीय झाले उध्वस्त!
sakal

बोलून बातमी शोधा

Chiplun Flood - महापुरामुळे चिपळूणवासीय झाले उध्वस्त!

Chiplun Flood - महापुरामुळे चिपळूणवासीय झाले उध्वस्त!

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी/चिपळूण : चिपळूण शहर पूर स्थितीमधून सावरत आहे. चिखल, पुरात वाहलेल्या गाड्या पाहायला मिळत आहे. जिल्हाभरातून विविध संस्था मदत घेऊन चिपळूणात दखल झाल्या आहेत. २६ जुलै २००५ च्या महापूरापेक्षा भयाण महापूर चिपळूणवासीयांनी अनुभवला आहे. या महापुराने चिपळूणवासीयांच्या सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बहादुरशेखनाका येथील वाशिष्टी नदीवरील पूल खचला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. महापुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांना एनआरडीएफ, कोस्टगार्ड, आर्मी, पोलीस यांच्या तुकड्यांसह चिपळूण, रत्नागिरी, मालवण येथील तरुणांनी सुरक्षित स्थळी हलवले.

या महापुरात १२ नागरिकांचा बळी गेला असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. तर हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी पहाटेपासून भरलेला महापूर खेर्डी, चिपळूण शहरातील काही भाग वगळता बाजारपेठेसह पेठमाप, गोवळकोट भागात पूर ओसरला नाही. यामुळे येथील नागरिकांना शुक्रवारी दूध, नाष्टा एनआरडीएफच्या तुकड्यांसह अन्य पथकांनी पोहोचवला. या भयाण महापुरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा: पोसरेत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 17 जण बेपत्ता

बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे वाशिष्टी व शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गुरुवारी पहाटे पासून चिपळूणसह खेर्डीमध्ये पूर भरण्यास सुरुवात झाली. हळूहळू पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने संपुर्ण चिपळूण शहराला पुराने वेढले. खेर्डीतही तीच परिस्थिती निर्माण झाली. चिपळूण-खेर्डीमध्ये पूर इतका वाढला की, सुरुवातीला घरांमध्ये पाणी शिरले. कालांतराने ते पोटमाळ्यापर्यंत पोहोचले. दुसरीकडे इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले. यामुळे नागरिकांनी टेरेस गाठला. या भयाण महापुरामुळे पुरात अडकलेले हजारो नागरिक मदतीसाठी याचना करू लागले. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात तितकीशी यंत्रणा नव्हती.

गेल्या दोन तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊस आणि बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे गुरुवारी पहाटे चिपळूणातील महापूर शुक्रवारी पहाटेपर्यंत जैसे थे होता. शुक्रवारी सकाळी हळूहळू पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. यामध्ये खेर्डी, चिपळूण-काविळतळी, मार्कडी, बहादुरशेखनाका, महामार्ग रेडिज पेट्रोल पंप परिसर, चिपळूण-गुहागर बायपास रोड देसाई बाजारपर्यत, विरेश्वर तलाव परिसर, भोगाळे पर्यत पाणी ओसरले. मात्र, चिंचनाका ते बाजारपेठ परिसरातील पाणी ओसरले नाही. जिथे जिथे पाणी ओसरले होते. तेथील परिस्थिती भयाण होती.

हेही वाचा: दरड कोसळली; आंबा घाट वाहतूकीसाठी बंद

दुकानांमध्ये चिखल, पाणी यामुळे मालाचे नुकसान झाले होते. वाहने इतरत्र फेकली गेली. काही वाहने गटारात जाऊन कलंडली. ही स्थिती पाहून यामुळे व्यापारी व गाडी मालकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. तसेच इमारतीच्या पार्किंग जागेत व घरांमध्ये शिरले चिखलमय पाणी बाजूला करताना नागरिकांची दमछाक दिसून आली. एकंदरीत पाणी ओसरले. मात्र, महापूरामुळे झालेल्या भयाण परिस्थितीमुळे अंगावर काटा उभा राहत होता. आता सारे या परिस्थितीतून बाहेर कसे पडणार ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. या महापुरामुळे चिपळूणवासीय उध्वस्त झाला हे खरे! आता शासन किती मदत करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

loading image
go to top