esakal | दहा दिवसांत तेरेखोलचा पुन्हा रूद्रावतार, जाणून घ्या बांद्याची स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Flood water at Banda konkan sindhudurg

आळवाडी येथील कित्येक दुकाने आज सकाळीच पाण्याखाली गेली होती. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला.

दहा दिवसांत तेरेखोलचा पुन्हा रूद्रावतार, जाणून घ्या बांद्याची स्थिती

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - शहर व परिसराला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तेरेखोल नदीने गेल्या दहा दिवसांत पुन्हा धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. तेरेखोल नदीचे पाणी आज सकाळीच शहरातील आळवाडी बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शहरातील आळवाडी-कट्टा कॉर्नर रस्ता नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला आहे. दुपारनंतर पाणी ओसरल्याने व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. 

वाचा - सावंतवाडीला पावसाने झोडपले; तेरेखोल नदीने ओलांडली पुन्हा धोक्याची पातळी

पाण्याची पातळी वाढत असल्याने ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. पुराचे पाणी वाढत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यास प्रारंभ केला आहे. पावसाचा जोर आज सकाळी देखील कायम आहे. हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने स्थानिक प्रशासन देखील सतर्क झाले आहे. गेल्या दहा दिवसांत शहरातील आळवाडी बाजारपेठेत दुसऱ्यांदा तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरले होते. आळवाडी येथील कित्येक दुकाने आज सकाळीच पाण्याखाली गेली होती. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला.

हेही वाचा - Good News : आता मध्य रेल्वे धावणार कोकण रेल्वे मार्गावर 

पुराचे पाणी वाढत असल्याने बांदा सरपंच अक्रम खान, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशांत पांगम, प्रसाद चिंदरकर, सुनील धामापूरकर यांनी सकाळीच याठिकाणी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत सरपंच खान यांनी सूचना दिल्या. 

संपादन - राहुल पाटील

loading image