खारेपाटणवर साठ वर्षे महापुराची टांगती तलवार 

खारेपाटणवर साठ वर्षे महापुराची टांगती तलवार 

खारेपाटण - स्वतंत्र्य तालुक्‍याचे मोठे स्वप्न पाहणाऱ्या खारेपाटणचा महापुराचा प्रश्‍न गेली 60 वर्षे सुटलेला नाही. वारंवार फटका बसूनही व सत्ताधाऱ्यांकडे व्यथा मांडूनही ही टांगती तलवार आजही कायम आहे. याचा परिणाम शहराच्या विस्ताराबरोबरच विकासावरही झाला आहे. 

1960 - 61 मध्ये खारेपाटणला सर्वप्रथम महापुराचा तडाखा बसला होता. त्यानंतर दरवर्षीच्या पावसाळ्यात खारेपाटण शहर तसेच चिंचवली आणि लगतच्या गावांवर महापुराची टांगती तलवार कायम राहिली आहे; मात्र गेल्या साठ वर्षांच्या कालावधीत महापुरापासून बचावासाठी संरक्षक भिंत, खाडीतील गाळ काढणे आदी उपाययोजनाच झाल्या नाहीत. साधी पूररेषा देखील निश्‍चित झालेली नाही. गेली चाळीस वर्षे लढा उभारून खारेपाटणचा स्वतंत्र तालुकाही निर्माण झालेला नाही. आता सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असलेले मुख्यमंत्री खारेपाटणच्या या प्रश्‍नांवर लक्ष देतील का? याची प्रतीक्षा खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिकांना आहे. 

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍याच्या हद्दीवरील विजयदुर्ग खाडीकिनारी गावातील मंडळी दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत धरून जगतात. खारेपाटण शहरात तर दरवर्षी महापुराचे पाणी येत असल्याने घरे, दुकाने पाण्याने वेढली जातात. यात व्यापारी आणि नागरिकांना लाखोंचा फटका बसतो. आपत्कालीन यंत्रणा देखील महापुरात नागरिकांना वाचवू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. महापुरामुळे खारेपाटण शहराप्रमाणेच लगतच्या गावातील शेकडो एकर भातशेतीचे देखील मोठे नुकसान होते; मात्र शासनाकडून तुटपुंजी मदत देखील मिळत नाही. 

ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांकडे मांडणार समस्या 
पूरहानी ओसरल्यानंतर नेतेमंडळींचे खारेपाटणला दौरे होतात. पूररेषा निश्‍चित होईल. खारेपाटण शहराला संरक्षण भिंत बांधून दिली जाईल. पूरबाधितांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होईल. खाडीतील गाळ काढला जाईल, अशा अनेकविध घोषणा होतात. प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही. आता महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने खुद्द मुख्यमंत्री सिंधुदुर्गात येत आहेत. खारेपाटणवासीयांच्या समस्या थेट त्यांच्यापुढे मांडल्या जाणार असून मुख्यमंत्री कोणत्या समस्या सोडवितात, याची प्रतीक्षा खारेपाटणवासीयांना आहे. 

स्वतंत्र तालुका निर्मितीची घोषणाच? 
कणकवली, वैभववाडी व देवगडातील सीमावर्ती आणि दुर्गम असलेली 60 ते 70 गावांचा मिळून खारेपाटण तालुका व्हावा, यासाठी गेली 40 वर्षे लढा सुरू आहे. तर महिन्यापूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आचारसंहितेपूर्वी खारेपाटण तालुक्‍याची निर्मिती होईल, अशी ग्वाही दिली होती; मात्र तालुका निर्मितीच्या कोणत्याही हालचाली नसल्याने स्वतंत्र तालुका निर्मिती ही घोषणाच राहणार का, असाही प्रश्‍न खारेपाटणवासीयांना पडला आहे. 

""स्वतंत्र खारेपाटण तालुका निर्मितीसाठी आमचा गेली 40 वर्षे लढा सुरू आहे. खारेपाटण दशक्रोशीतील अनेक गावांना कणकवली मुख्यालयात येण्यासाठी 40 ते 50 किलोमीटरचा फेरा पडतो. तशीच परिस्थिती देवगड आणि वैभववाडीतील अनेक गावांची आहे. खारेपाटण दशक्रोशीतील या सर्व गावांच्या विकासासाठी स्वतंत्र खारेपाटण तालुका व्हायलाच हवा, असे आमचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे आहे.'' 
- कांतप्पा शेट्ये,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com