कोकणात वृक्षलागवडीसाठी लोकचळवळ

कोकणात वृक्षलागवडीसाठी लोकचळवळ

चिपळूण - जागतिक तापमान वाढ, ऋतू बदल आणि राज्यातील वनक्षेत्र २० टक्‍क्‍यांवरून ३३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. १ जुलै ते ७ जुलै या वनमहोत्सव कालावधीत होणाऱ्या या वृक्षारोपण मोहिमेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी महसूल विभागाकडून चळवळ सुरू झाली आहे. नियोजनासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार गावनिहाय बैठका घेत आहेत. 

गेल्यावर्षी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत एकूण ३० लाख ४० हजार ११७ रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल ८० टक्के म्हणजे २४ लाख ४ हजार ८९५ रोपे जगल्याचा दावा शासनाने केला आहे. यावर्षी रोपे जगवण्याचे प्रमाण ९० टक्के करण्याचा संकल्प कोकण विभागाने केला आहे. गेल्यावर्षी १ जुलै २०१६ ला जनतेच्या सक्रिय सहभागामुळे एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहजगत्या साध्य झाले. १ जुलै २०१६ रोजी २ कोटी ८२ लाख वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी वने व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिथे अडचण असेल तिथे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत रोपे देण्याचाही  प्रयत्नही होणार आहे. कमी पाण्यावर जगणारी व लवकर वाढणाऱ्या रोपांची लागवड होणार आहे. त्यासाठी आंबा, चिंच, आवळा, फणस, वन, पिंपळ, कडुलिंब, पळस, कॅशिया, रेन ट्री, गुलमोहर, चाफा या झाडांना प्राधान्य मिळेल. संयुक्त वनव्यवस्थापन समिती, हरित सेना, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, स्वाध्याय परिवार भक्तगण यांच्यामार्फत लागवड व संगोपन केले जाणार आहे. गेल्यावर्षी शासनाने २१ विभाग मोहिमेत सहभागी झाले होते. यावर्षी ३३ विभाग सहभागी होणार आहे. त्यात शासकीय व निमशासकीय मंडळांचा 
समावेश आहे. 

वृक्ष लागवडीच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविण्यासाठी आम्ही गावनिहाय बैठका घेऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. त्यामुळे यावर्षी वृक्षलागवडीला ग्रामस्थांचा चांगला सहभाग मिळेल. 
- जीवन देसाई, तहसीलदार, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com