वनक्षेत्र नोंदीने जानवलीच्या विकासाला खो

वनक्षेत्र नोंदीने जानवलीच्या विकासाला खो

कणकवली - महामार्ग चौपदरीकरणात कणकवली शहरात उड्डाणपूल असल्याने शहरालगतच्या जानवली आणि वागदे गावांचे शहरांत रूपांतर होईल. या गावांमध्ये नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊन ही गावे विकासाच्या नकाशावर येतील, अशी अपेक्षा होती; मात्र जानवलीतील महामार्ग दुतर्फा बहुतांश क्षेत्र हे वनसंज्ञा आणि वनक्षेत्रामध्ये मोडत आहे. त्यामुळे चौपदरीकरण होऊन देखील जानवली गावच्या विकासाची संधी हुकली आहे.

महामार्ग चौपदरीकरणात हुंबरट येथील उताराचा मार्ग आणि त्यापुढे असलेला हुंबरट आणि साकेडी अंडरपास सोडल्यानंतर वाहने जानवली गावात येणार आहेत. जानवली गावात दोन्ही बाजूंनी मोकळे क्षेत्र असल्याने या ठिकाणी नवीन बाजारपेठ उदयाला येईल. नव्या उद्योगसंधी निर्माण होतील, अशी अपेक्षा होती. सद्यःस्थितीत जानवली नदी ते हॉटेल नीलम्स कंट्रीसाईडपर्यंत अनेक कंपन्यांचे शोरूम उघडण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर पुढील भागातही व्यवसाय संधी निर्माण होण्याची अपेक्षा होती; मात्र जानवली गावातील बहुतांश भाग वनक्षेत्र नोंदीत येत असल्याने विकासाच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे.

वनक्षेत्र नोंदीमुळे जानवलीतील महामार्ग चौपदरीकरणाचे काम देखील गेली दोन वर्षे ठप्प होते. दोन महिन्यापूर्वी फक्‍त चौपदरीकरण कामापुरतीच वनक्षेत्र नोंद उठविण्यात आली. त्यामुळे येथील चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. महामार्गलगतच्या इतर क्षेत्राची वननोंद उठविली गेली तरच जानवली गावात चौपदरीकरणामुळे नोकरी-व्यवसायाच्या संधी मिळतील; मात्र त्यासाठी मोठा लढा उभारावा लागण्याची शक्‍यता आहे.

जानवली गावात महामार्गलगत दोन प्राथमिक शाळा आहेत. या शाळांत ये-जा करणाऱ्या मुलांसाठी अंडरपास किंवा फुटओव्हर ब्रिज करावा अशीही मागणी इथल्या ग्रामस्थांची होती; मात्र ही मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे या शाळांत जा-ये करणाऱ्या मुलांना महामार्ग ओलांडण्याचे दिव्य पार पाडावे लागणार आहे. जानवली गावच्या सीमेवर तरंदळे फाटा येथे अंडरपाससाठी ग्रामस्थांनी लढा उभारला होता. या लढ्याला यश आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. मात्र, साकेडी फाटा येथे अंडरपास नामंजूर झाल्याने इथल्या नागरिकांना एक किलोमीटरचा वळसा घालून गावात जावे लागणार आहे.

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com