रत्नागिरी; वनविभागाला बिबट्याचा पुन्हा गुंगारा, नाखरेतील घटना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत असताना स्थानिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने नाराजीचा सूर निघत आहे.

पावस - रत्नागिरी तालुक्यातील नाखरे परिसरात दिवसाढवळ्या पाळीव प्राण्यावर बिबट्याने हल्ला केल्याने गावामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभाग बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न करत असूनही बिबट्या मुक्त संचार करत असल्याने येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

मेर्वी परिसरात दोन वेळा माणसांवर हल्ले केल्यानंतर वनविभाग सतर्क झाला. त्याला पकडण्यासाठी त्यांनी लावलेल्या सापळ्यात न अडकता त्यांना हुलकावणी देत तो मुक्त संचार करीत आहे. मेर्वी-खालची म्हादयेवाडी येथील जंगलामध्ये गायीवर हल्ला करून तिला ठार मारले होते. त्यामुळे वनविभागाने पावस ते पूर्णगड यादरम्यान लक्ष केंद्रित केले होते. मात्र बिबट्याने पुन्हा त्यांना हुलकावणी देत नाखरेत दर्शन दिले. 6 ऑक्टोबरला सायंकाळी साडेतीनच्या सुमारास नाखरे-भगवतीवाडी येथील सुनीता जाधव या जंगल भागात बकर्‍या चरवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दुपारी साडेतीनच्या सुमारास कळपातील एका बकरीवर बिबट्याने हल्ला केला. हे लक्षात येताच त्यांनी काठी घेऊन आरडाओरड सुरू केली. जवळच असलेल्या गुराख्याच्या मदतीने बकरीच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे बिबट्या पळून गेला. परंतु बिबट्याने बकरीची मान पकडल्यामुळे ती अर्धमेली झाली होती. ही घटना वनविभागाला कळविण्यात आली.
 दोन तासानंतर नाखरे-खांबडवाडी येथील तुषार विठोबा वाळिंबे यांच्या बागेमध्ये गुरे सोडण्यात आली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास चरत असलेल्या पाड्यावर बिबट्याने हल्ला केला. हा पाडा जखमी अवस्थेत सापडला. वनविभागाने पंचनामा केला. दोन्ही ठिकाणी हल्ले केल्यानंतर रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या निमित्ताने बिबट्या परत येईल, या शक्यतेने दोन्ही ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावले. मात्र त्यातील एका पिंजर्‍याजवळ रात्री बिबट्या येऊन फेर्‍या मारून गेल्याचे त्याच्या पावलावरून दिसून आल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले.

हे पण वाचाकुणबी समाजाच्या असंतोषाला वाचा फुटणार

 

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत असताना स्थानिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने नाराजीचा सूर निघत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजर्‍यामध्ये भक्ष्य ठेवलेले असते. मात्र काही लोक रात्री पिंजर्‍यावर बॅटरी मारुन बिबट्या अडकला का हे पाहण्यासाठी फिरत असल्याने बिबट्या पिंजर्‍याजवळ येण्यास कचरत असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. रात्रीच्यावेळी पिंजर्‍याकडे जात असताना बिबट्या त्यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, असे वनविभागाचे म्हणणे आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Department did not find the leopard in ratnagiri