कोट्यवधी खर्चुनही सिंधुदुर्गातील वनपर्यटन अडगळीत 

कोट्यवधी खर्चुनही सिंधुदुर्गातील वनपर्यटन अडगळीत 

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालून पर्यटनस्थळे विकसीत करण्यात आली; मात्र वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे विकसीत पर्यटनस्थळांपर्यंत अपेक्षीत पर्यटक पोहोचत नसल्याचे किंवा तसे कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे वास्तव आहे. पर्यटन जिल्ह्यातल्या या विरोधाभासाचे वास्तव मांडण्याचा हा प्रयत्न... 

सिंधुदुर्गाची वनसंपदा 
सिंधुदुर्गाचा आकार छोटा असला तरी येथील वनक्षेत्र तुलनेत समृद्ध आहे. येथे खाजगी वनाचा भागही मोठा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानिकांनी शिकारीसाठी काही जंगलक्षेत्र राखून ठेवले होते. त्यातील बरेच क्षेत्र नंतर शासन जमा झाले. तेच राखीव जंगल म्हणून विकसीत केले गेले. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाल्यानंतर येथे नवनवीन पर्यटन क्षेत्र विकसीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. यातून राखीव वनक्षेत्रातील निसर्गसंपन्न स्थळांवर कोट्यवधीचा निधी खर्च होवू लागला. खारफुटी किंवा कांदळवन क्षेत्रही शासनाकडे येते. याभागावरही वनविभागाचे नियंत्रण असल्याने त्याच्या विकासासाठीचा निधी वनविभागाकडे येवू लागला. 

नवे कुरण 
वनविभागाचे काम प्रामुख्याने वनसंवर्धन आणि संरक्षण हे आहे. यामुळे वनक्षेत्रात ते सार्वजनिक बांधकाम व इतर निर्माण क्षेत्रातील विभागांना काम करायला देत नाहीत. यामुळे आंबोलीसह अनेक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी स्वतः वनविभाग पर्यटनासाठीच्या बांधकामाचे काम करतो; मात्र त्याचे हे मुळ काम नसल्याने यातही बऱ्याच त्रुटी असतात. आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोपही अनेकदा झाले आहेत. त्यापेक्षा विचित्र स्थिती म्हणजे एखाद्या स्थळावर पर्यटक यावेत यासाठी कोट्यवधीचा खर्च केला जातो; मात्र तेथे पर्यटक येण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. शासनाचा महाराष्ट्र पर्यटन विभाग या वनक्षेत्रांकडे ढुंकूनही बघत नाही. एखाद्या वनहद्दीतील स्थळावर पर्यटक आले तरी वनविभागाच्या लांबलचक नियमावलीमुळे तो पुन्हा तेथे फिरकत नाही. पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणारे कुशल मनुष्यबळ या वनविभागाकडे नाही. यामुळे विकसीत पर्यटन स्थळेही ओस पडल्याचे चित्र आहे. 

अशी आहे अवस्था  
आंबोली धबधबा 
जिल्ह्याला देशपातळीवर नावारुपास आणणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोली धबधब्याकडे पाहिले जाते. हे स्थळ वनविभागाच्या हद्दीत येते. गेली कित्येक वर्षे हे ठिकाण भौतिक सुविधेपासून दुर्लक्षितच आहे. भौतिक सुविधांचा अभाव व धोकादायक दरडीच्या वृत्ताने येथे येणारे पर्यटक माघारी परतत आहेत. याठिकाणी फक्त पायऱ्या व रेलिंग सोडून अन्य कोणत्याही प्रकारची डागडुजी झाली नाही. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात मात्र याठिकाणी धबधब्यावर आंघोळीसाठी येणाऱ्या पर्यटकांना सुसज्ज चेजिंग रुम उपलब्ध नसल्यामुळे जंगले व दुसऱ्याच्या घरांचा आधार घ्यावा लागतो. येथे शौचालय व चेजिंग रुम या दोन्हीची फार नितांत गरज आहे. पर्यटकांची संख्या पहाता याठिकाणी रस्त्याचे रुंदीकरणही गरजेचे आहे. यात वनविभागाचा अडसर आहे. यासाठी पुर्वीचा वस ते धबधब्या जवळील परिसरात एखाद्या भुगोल शास्त्रज्ञांकडून सर्वे करून जाळी बसविणे ही सुरक्षितेच्या दृष्टीने गरजेचे आहे. येथे चांगले समृद्ध जंगल आहे; मात्र ते पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे. या जंगलात जाण्याची जंगल सफारीसारखी व्यवस्था वनविभागाने करणे आवश्‍यक आहे. 

रांगणागड 
वनक्षेत्रात येणाऱ्या रांगणागडावर जाण्यासाठी नारुर आणि पांग्रडमधून रस्ते आहेत. येथे पोहोचण्यासाठी अडीच तासांचा पायी प्रवास करावा लागतो. शिवाय याठिकाणी जातेवेळीही चढण लागत असल्याने दमछाक होते. याठिकाणी कोल्हापूर येथून सोयीचा मार्ग असल्याने तेथून पर्यटक येतात; मात्र सिंधुदुर्गातील पर्यटकांना हा मार्ग कठिण असल्यामुळे या भागाकडे गोवा व सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. याठिकाणी कौलारु छप्पर असलेल्या गोलाकार आसऱ्याची सोय आहे. याठिकाणी 8 ते 10 माणसे थांबू शकतात. पांग्रड किंवा नारुरमधून जाण्यासाठी ट्रेकिंग व वन्य अभ्यासक वस्तीला राहण्याची तयारी करून जातात; मात्र तेथे राहण्यासाठी रुम, टॉयलेट व पाण्याची सोय नसल्याने येथे पर्यटन बहरले नाही. कोल्हापूरमार्गे येणारे पर्यटकांकडून जंगलात जेवण बनविण्याच्या प्रकारामुळे कचरा होतो. याठिकाणी जाण्यासाठी रस्त्याची डागडुजी तसेच पर्यटकांसाठी रोपवे होणे गरजेचे आहे. समृद्ध जीवसृष्टीही या जंगलात आढळते. ट्रेकिंगसाठी व जंगलसफारीसाठी हे उत्तम क्षेत्र समजले जायचे; मात्र त्या दृष्टीने याचा विकास झालेला नाही. 

कुंभवडे धबधबा 
अलिकडेच विकसित झालेला कणकवली तालुक्‍यातील कुुंभवडे धबधबा पर्यटनाचे केंद्र बनला आहे. कुंभवडेतून 20 ते 30 मिनिटांचा पायी प्रवास करावा लागतो. पर्यटकांच्या आकर्षणासाठी वनविभागाने याठिकाणी जाण्यासाठी पायवाट, धबधब्याखाली सुरक्षित डोह, गुहेत बसण्यासाठी बाक, डोहात उतरण्यासाठी पायऱ्या अशी विविध बांधकामे येथे झाली; मात्र कणकवली, कनेडी, नरडवे, सावडाव याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांपर्यत या धबधब्याची माहिती पोचेणेही गरजेचे आहे. धबधब्याच्या वरच्या बाजुला सेल्फी काढण्यासाठी काही हौशी तरुण व नागरीक जातात. खाली तोल जाण्याची भीती असल्यामुळे त्याठिकाणी जाळी बसविणे गरजेचे आहे. धबधब्यावरून पडणारे पाणी डोहातच साठले जात नाही. त्यासाठी उपाययोजना होणे, लहान मुले व महिलांसाठी अजुन एक लहान बंधारा बांधण्याचीही येथे गरज आहे. धबधब्यावर जाणाऱ्या पायवाटेवर लोखंडी मजबुत रेलिंगचीही आवश्‍यकता आहे. धबधब्याजवळील पायवाटेवर ओहोळावर साकव बसविण्याचीही मागणी होत आहे. तरच येथे आणखी पर्यटन वाढू शकते. 

मांडवी खाडी सफर 
महिला बचत गटाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वीपासून मांडवी खाडीमध्ये पर्यटकांना मांडवी खाडी ते मानसीश्‍वर या एक तासाच्या कालावधीत सफर घडवून आणली जाते. 10 महिलांचा बचत गट असून महिलांकडून चालविण्यात येणारा सफरीचा हा देशातील पहिलाच प्रकल्प समजला जातो; मात्र याठिकाणी पर्यटन अपेक्षेप्रमाणे पोहोचले नाही. वेंगुर्लेत येणाऱ्या पर्यटकांना माहिती होण्यासाठी शहरात बॅनरही नसल्यामुळे पर्यटकांपर्यंत माहिती पोचण्यास अडचण येत आहे. 2015 साली कांदळवन विभाग व वनविभागाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळाले. यातून गजिबो, इंजिन व दुर्बिणी मिळाल्या. या महिला होडी वल्हवून पर्यटकांना कांदळवन सफर, पक्षी निरीक्षण, तसेच बचत गटातील महिलांकडून माहिती देतात. या प्रकल्पाबाबत माहिती मिळताच पर्यटक या सफरीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येतात; मात्र त्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोचवण्यासाठी काहीच केले जात नाही. येथे येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची सोय नसल्याने ते निघून जातात. राहण्यासाठी हॉटेलची सोय होणे गरजेचे आहे. वनविभागाने पर्यटन वाढीसाठीही प्रयत्न केल्यास इतर बचत गटांना रोजगारही मिळू शकतो. 

तळकट वनबाग 
तळकट वनउद्यान व येथील धबधबा पहाण्यासाठी दोडामार्ग, सावंतवाडी व गोव्यातील पर्यटक येतात; मात्र त्यांना या प्रकल्पाला भेट देताना बऱ्याचदा येथील गेट बंद असल्याचे आढळते. त्यामुळे त्यांना नाराज होवून माघारी परतावे लागते. येथे येणाऱ्या अनेक पर्यटकांना हा अनुभव येतो. येथील पर्यटकांना आत प्रवेश मिळत नसल्यामुळेच पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे या वनउद्यानात झालेली लाखोंची कामे कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याठिकाणी वनविभागाकडून बांधकामे झालीत; मात्र येथे कायमस्वरुपी पर्यटन वाढीच्या दृष्टीने स्वतंत्र कर्मचारी ठेवावा, अशी मागणी केली जात आहे. येथे असलेला धबधबा अनेक पर्यटकांचा आकर्षणाचा विषय आहे; मात्र त्याचा विकास झालेला नाही. ग्रामस्थांना विश्‍वासात घेवून तो करणे शक्‍य आहे. वनविभागाकडून वनउद्यानात व धबधब्याजवळ बांधकामे झाली असली तरी त्याचे त्यावर नियंत्रण असणेही गरजेचे बनले आहे. वन उद्यानाच्या परिसरातील जंगलात अनेक प्रकारची जैवविविधता आढळते. त्यामुळे अभ्यासकांसाठी हा एक महत्वाचे ठिकाण ठरु शकते; मात्र सोयी सुविधाही आवश्‍यक आहेत. या परिसरात बिबट्या, पट्टेरी वाघ यांसह इतर प्राणी पक्षी पहायला मिळतात. 

सावंतवाडी नरेंद्र उद्यान 
माजगाव व मळगाव आणि सावंतवाडी शहराला लागून नरेंद्र डोंगराच्या सीमा आहेत. या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. शहरापासूनच तीन किलोमीटर नरेंद्र डोंगरावर वनविभागाकडून वनउद्यान उभारले आहे. याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपये खर्चून सुशोभिकरण व डागडुजी केली आहे; मात्र या उद्यानात पक्षी मित्र किंवा पर्यावरण अभ्यासकाशिवाय कोणीही पर्यटक फिरकताना दिसत नाहीत. उद्यानाकडे जाणारा रस्ता चांगल्या स्थितीत नसल्यामुळे तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हे उद्यान पर्यटकांपासून कायमच दुर्लक्षित आहे. आंबोली नंतर शहरातील निसर्ग सौंदर्याचे हे एकमेव सुंदर ठिकाण समजले जाते. याठिकाणी वनविभागाकडून नुकतेच रात्रीच्यावेळी उद्यान प्रकाशमान करण्यात आले. वनक्षेत्रात रस्त्याचे काम होवू शकत नसल्यामुळे पुढील सर्व पर्यटन रोडावले आहे. रस्ता, पर्यटकांसाठी रेस्टॉरंट व इतर भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याचा फटका येथे बसतो. याठिकाणी जैवविविधता भरपूर असल्यामुळे येथे पक्षी मित्र, पर्यावरण अभ्यास भेट देतात. शहरात पर्यटक येतात; मात्र त्यांना नरेंद्र डोंगराविषयी काही माहितच नसते त्यामुळे ते परततात. येथे उभारलेल्या उद्यानाचीही दुरवस्था झाली आहे. 

पर्यटनस्थळांसाठीचा खर्च (2017-18 व 2018-19) 

  • आंबोली धबधबा - धबधब्याजवळ सिट आऊट बसविणे, सिमेंट छत्री बसविणे. एकूण खर्च 2 लाख 78 हजार 180. 
  • रांगणागड - येथील पायवाट व धबधब्याजवळ झालेली कामे-प्रवेशद्वार, केबीन, निरीक्षण मनोरा, कुंड्या बसविणे, बैठक व्यवस्था, रेलिंग बसविणे, बंधारा तयार करणे, फलक लावणे, रेलिंगचे रंगकाम, पॅगोडा, कंपाऊंड वॉलचे बांधकाम. एकूण खर्च 43 लाख 99 हजार 600 रुपये. 
  • कुंभवडे धबधबा - पायवाट, बसण्याची व्यवस्था, डोह, गुहेत बसण्याची व्यवस्था. एकूण खर्च 11 लाख रुपये. 
  • मांडवी खाडी - बोट इंजिन खरेदी. एकूण खर्च 3 लाख 15 हजार. 
  • तळकट वनबाग - वनरक्षक निवासस्थान व वनकुटीर इमारत वेदरशेड, निवासस्थान नुतनीकरण, स्वच्छतागृह नुतनीकरण, वनकुटीर इमारत नुतनीकरण, माहिती फलक, कुड्या रुगविणे, साफसफाई. एकूण खर्च 10 लाख रुपये. 
  • सावंतवाडी नरेंद्र उद्यान - कुंड्यांना रंग देणे, शेणखत देणे, रोपे लावणे, (दोन वर्षे), पॅगोडा, रस्ता, प्रवेशद्वार, माहिती फलक, उपरलकर प्रवेशद्वार. एकूण खर्च 21 लाख 18 हजार 356 रुपये. 

पर्यटन धोरणाची गरज 
पर्यावरण अभ्यासक प्रा.हसन खान म्हणाले, की जिल्ह्याला निसर्ग सौंदर्याचा वारसा आहे. काही पाणथळ भूमीमध्ये रामसार साईट होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटण्याची क्षमता आहे. त्यासाठी त्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करणे आवश्‍यक. जिल्ह्यातील अनेक वनक्षेत्रे ही दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राण्यांचे अधिवास आहेत. काही भागात प्राचिन मूर्ती सापडल्या आहेत. अशा ठिकाणांना योग्य प्रकारे प्रसिद्धी दिल्यास पक्षी निरीक्षक, वनस्पती अभ्यासक, इतिहास संशोधक, शैक्षणिक संशोधक, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक अभ्यासक येऊन वेगवेगळ्या पर्यटन प्रकारांना चालना मिळेल. सह्याद्री क्षेत्र खुले करून साहसी पर्यटनाला चालना मिळू शकते. यासाठी एका वेगळ्या दृष्टीने पर्यटन धोरण आखण्याची गरज आहे; परंतु हे सर्व करताना कुठेही पर्यावरणाला, परिसंस्थेला धोका पोचणार नाही याची काळजी घ्यावी. 

जिल्ह्याला निसर्गाने दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे येथील वनसंपदा. वनविभागाने अनेक पर्यटनस्थळे विकसित केली आहेत; मात्र त्याकडे जाण्यासाठी व राहण्यासाठी असलेल्या काही भौतिक असुविधांमुळे पर्यटक या ठिकाणांपासून दूरच राहिला आहे. पर्यटनस्थळांचा विकास होणे आवश्‍यक असेल तर भौतिक सुविधा गरजेच्या आहेत. वनपर्यटन स्थळांकडे हौशी साहसी पर्यटकांचा ओढा असतो. पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवणेही पर्यटकांचे कर्तव्य आहे. 
- प्रा. गणेश मर्गज,
पर्यावरण अभ्यासक तथा पांग्रड ग्रामस्थ. 

वनपर्यटन स्थळांकडे पर्यटक वाढवण्यासाठी संकेतस्थळ तयार करत आहोत. भविष्यात त्याचा फायदा होईल. तळकट येथील वनउद्यानाचे सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत गेट खुले असते. रात्री ते बंद करण्यात येते. काही पक्षी निरीक्षक व अभ्यासकांची वनक्षेत्रात रात्री फिरण्याची इच्छा असते; मात्र त्याला मंजुरी नाही. रांगणागड येथेही मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. वनक्षेत्रात वावरताना नियम पाळायला हवेत व निसर्गाची सुंदरता राखायला हवी. 
- समाधान चव्हाण,
उपवनसंरक्षक वनविभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com