माजी खासदार नीलेश राणे यांना कोरोनाची लागण : संपर्कातील व्यक्तीना स्वॅब टेस्ट करण्याचे केले आवाहन

सकाळ वृत्तसेवा | Monday, 17 August 2020

स्वतः नीलेश राणे यांनी ट्विट करत आपली स्वॅब टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.

कणकवली (सिंधुदुर्ग) : माजी खासदार नीलेश नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेले काही दिवस जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरा केला होता. आज स्वतः नीलेश राणे यांनी ट्विट करत आपली स्वॅब टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. संपर्कातील कार्यकर्त्यांनी स्वॅब टेस्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

माजी खासदार राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वतःला क्वारंटाईन करून चाचणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली तरीही क्वारंटाईन, कुणासाठी हा नियम? -

 जिल्ह्यात आणखी ६७ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६०० वर गेली असून, एकूण ६३५ रुग्ण झाले. आणखी १७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या ४१६ झाली आहे. आणखी एका बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. आजअखेर १२ बळी गेले असून, जिल्ह्यात सक्रिय रुग्ण २०७ आहेत.

हेही वाचा-पावसाचा कहऱ; छप्पर कोसळून दोन छोट्या बहिणी जखमी.....कुठे घडले वाचा -

नवे सात कंटेन्मेंट झोन
सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील सोहेब मुबीन बेग यांच्या घरापासून (घर क्रमांक १७२) चहुबाजूंनी ५० मीटर परिसर, देवगड शहरातील चोपडेकर चाळ येथील रेश्‍मा महंमदहमीद साठविलकर यांच्या घरापुरताचा परिसर, देवगड तालुक्‍यातील मुणगे आडबंदर येथे कविता कमलाकर सारंग यांच्या घरापुरताचा परिसर, कणकवली तालुक्‍यातील वारगाव सुतारवाडी येथील मधुकर सदाशिव मेस्त्री यांचे घर व ५० मीटर परिसर, शास्त्रीनगर- घोसाळवाडी येथील अशोक बाबू वाळके यांचे घर व ५० मीटर, खारेपाटण- शिवाजी पेठ येथील रफीक हाजीगफर मेमन यांचे घर व ५० मीटर परिसर, शहरातील बाजारपेठ येथील मलकानसिंग हे राहत असलेले मुंज बिल्डिंग व परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केले.

संपादन - अर्चना बनगे