'प्रामाणिक काम करूनही  किंमत नसल्याने भाजपमध्ये '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

गेली काही वर्षांपासून जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करीत होतो. जिल्ह्यात काम करण्यासाठी आलो त्यावेळी विकासाच्या काही संकल्पना आपल्या मनात होत्या. त्या राबविण्यासोबतच पक्ष बळकट करणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना पाठबळ देणे हे आपले धोरण होते; मात्र येथे आल्यानंतर स्वकियांच्या विरोधालाच सामोरे जावे लागले. 
- अतुल रावराणे 

वैभववाडी - ज्या कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला संपविण्याचा प्रयत्न केला त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना साथ देण्याचे काम केले. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांचे नुकसान झाले. प्रामाणिक काम करूनसुद्धा कार्यर्त्यांना किंमत मिळत नसल्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला. यापुढे भाजपचे निष्ठेने काम करणार असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसला जशास तसे उत्तर देणार असल्याचे मत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी येथे व्यक्त केले. 

श्री. रावराणे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश केला. यानंतर बुधवारी (ता.11) त्यांचे येथील भाजप कार्यालयात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, बंडू मुंडल्ये, राजेंद्र राणे, विजय रावराणे, महेश रावराणे, सुहास सावंत, रत्नाकर कदम, संतोष बोडके, हिरा पाटील, सुविधा रावराणे, उत्तम सुतार आदी उपस्थित होते. 

श्री. रावराणे म्हणाले, ""प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण झाले. पक्षविरोधी काम करणाऱ्या लोकांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठीशी घालण्याचे काम केले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. विकासाचे कोणतेही काम पक्षाच्या माध्यमातून होत नव्हते. त्यामुळे ज्या कामांसाठी जिल्ह्यात आलो ते साध्य होत नव्हते. याचा विचार करून आपण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप सरकार कोकण विकासाबाबत सकारात्मक आहे. अनेक मोठे प्रकल्प या सरकारच्या माध्यमातून आकारास येत आहेत. अशा सर्वांगीण विकासाची आपल्याला आस आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना लोकांपर्यंत पोचविण्यात येतील.''

Web Title: Former state secretary of the Nationalist Youth Atul ravarane