चार नगरसेवकांसह वीस अर्ज अवैध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

राजकीय पक्षांसाठी 'ऑल इज वेल'


निवडणूक रिंगणात स्वबळावर उतरलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि भाजप या पक्षांच्या उमेदवारांचे प्रत्येकी सतरा, तर राष्ट्रवादीचे सहा आणि मनसेचे दोन असे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या भाजपच्या बंडखोर उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यासह उपनगराध्यक्ष राजन पोकळे, यशवंत पेडणेकर, बापू गव्हाणकर, बबन साळगावकर, संदीप कुडतरकर, मनोज नाईक यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

सावंतवाडी - येथील पालिका निवडणुकीसाठीची छाननी प्रक्रिया आज पार पडली. यावेळी एकूण 20 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. यात अपक्ष उमेदवारांचा भरणा अधिक आहे. विद्यमान चार नगरसेवकांसह भाजपतून बंडखोरी केलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांचा अर्ज एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध ठरला. त्यामुळे आता 17 जागांसाठी 86 उमेदवारी अर्ज उरले आहेत.

छाननी प्रक्रिया आज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या उपस्थितीत झाली. अर्ज मागे घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना 11 नोव्हेंबरपर्यंत संधी देण्यात आली आहे, असे श्री. इनामदार यांनी सांगितले.
येथील पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया आज सकाळी अकरा वाजता प्रांताधिकारी कार्यालयात सुरू केली. यात प्रभाग एकमधून विद्यमान नगरसेविका अफरोझ राजगुरू यांचा अर्ज एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध ठरला, तर त्यानंतर प्रभाग दोनमधून विद्यमान नगरसेविका शर्वरी धारगळकर यांच्यासह शिवसेना डमी उमेदवार असलेल्या अनिता भाईडकर यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यानंतर झालेल्या प्रक्रियेत सीमा मठकर यांचा एक अर्ज वैध ठरला आहे. दुसरा अर्ज पाच सूचक नसल्यामुळे अवैध ठरला आहे. प्रसाद बाळकृष्ण पावसकर यांच्या दोन अर्जांवर एकच सूचक असल्यामुळे त्यांचा एक अर्ज अवैध ठरला आहे.

त्याचबरोबर प्रभाग पाचमधून शिवसेनेच्यावतीने डमी म्हणून अर्ज सादर केलेल्या काशिनाथ ऊर्फ बाबल्या दुभाषी यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्याच ठिकाणी विद्यमान नगरसेविका वैशाली पटेकर यांचासुद्धा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.
प्रभाग सहामधून अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या शरद जामदार यांच्यासह हनुमंत ऊर्फ संतोष मुळीक यांचा अर्ज सूचक नसल्यामुळे अवैध ठरविण्यात आला आहे, तर त्या ठिकाणी भाजपच्या महेश पांचाळ यांचाही अर्ज अवैध ठरला आहे.
प्रभाग सातमध्ये अपक्ष उमेदवार संदीप कृष्णा वेंगुर्लेकर यांचा तसेच विद्यमान नगरसेविका क्षिप्रा सावंत यांच्यासह कल्पना बांदेकर यांचा अर्ज अवैध ठरला आहे. या सर्व उमेदवारांची संख्या 14 असली तरी अन्य सहा ठिकाणी एकाच उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यांची संख्या वीस झाली आहे. त्यामुळे आता फक्त 86 उमेदवार रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती श्री. इनामदार यांनी दिली. या वेळी उपस्थित असलेल्या कोणत्याही उमेदवाराकडून अथवा त्यांच्या प्रतिनिधींकडून प्रक्रियेला विरोध झाला नाही.

Web Title: Four application including corporators rejected