सावधान ! सावंतवाडीत आणखी चार कोरोनाग्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

ज्या भागात हे रूग्ण आढळून आले आहेत तेथील त्यांचा वावर लक्षात घेत तो परिसर व घर कंन्टेमेंट झोन जाहीर करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याची संख्या वाढत आहे.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - शहरात आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात खासकीलवाडा येथील तीन तर सालईवाडा भागात एक रुग्ण आहे. विशेष म्हणजे यात बाहेरचावाडा येथील सेवा देणाऱ्या माजगाव येथील डॉक्‍टरच्या संपर्कातील दोघांचा सहभाग आहे. पालिकेचे नोडल अधिकारी डॉ. उमेश मसुरकर हे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांनी स्वतःलाच क्वारटांईन करुन घेतल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

ज्या भागात हे रूग्ण आढळून आले आहेत तेथील त्यांचा वावर लक्षात घेत तो परिसर व घर कंन्टेमेंट झोन जाहीर करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याची संख्या वाढत आहे. या आठ दिवसांमध्ये ही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून पालिका प्रशासनाकडूनही याबाबत जातीनिशी खबरदारी घेतली जात आहे.

शहरामध्ये बाहेरचावाडा याठिकाणी रुग्णसेवा बजावणाऱ्या माजगाव येथील एका डॉक्‍टरला कोरोनाची लागण झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून या डॉक्‍टरच्या संपर्कातील आलेल्यांना उपजिल्हा रुग्णालयांमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यातील काहींनी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये धाव घेतली. त्यामध्ये आतापर्यंत काहींचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले आहेत. आज आलेल्या अहवालामध्ये शहरांमध्ये अजून चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या चार व्यक्तींच्या संपर्कातील इतरांचा सर्वे सुरू असून थेट संपर्कात आल्याने स्वतःहून समोर घेण्याचे आवाहन पालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे. बाजारपेठेमध्ये आलेल्या ग्रामीण भागातील फिरत्या व्यापाऱ्यांसह दुकानदारांचीही थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत असून यासंदर्भात काही सूचना व नियमही पालिकेने आखले आहेत. 

पालिका हद्दीत आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्यांची एकुण संख्या 29 वर गेली असुन त्यापैकी 14 रुग्ण ऍक्‍टीव्ह तर 14 रुग्ण सक्रीय आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला असुन नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहन नगराध्यक्ष परब यांनी केले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Corona Patient Found In Sawantwadi Sindhudurg Marathi News