व्हीप डावलल्यामुळे लांजातील चार नगरसेवक अपात्र

रवींद्र साळवी
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्ष निवडणूक १० ऑगस्ट २०१७ ला पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेने वन टू का फोर करून शिवसेनेचे सुनील कुरूप नगराध्यक्ष तर शहर आघाडीतून फुटून गेलेले मनोहर कवचे उपनगराध्यक्ष निवडून आले होते.
 

लांजा - नगरपंचयातीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडणुकीत पक्षादेश (व्हीप) डावलून शिवसेनेला मतदान केलेल्या लांजा कुवे शहर विकास आघाडीच्या चार नगरसेवकांविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यात संबंधित चार नगरसेवकांना व्हीप डावलल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले आहे.

लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्ष निवडणूक १० ऑगस्ट २०१७ ला पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेने वन टू का फोर करून शिवसेनेचे सुनील कुरूप नगराध्यक्ष तर शहर आघाडीतून फुटून गेलेले मनोहर कवचे उपनगराध्यक्ष निवडून आले होते.

नगरपंचायतीत लांजा कुवे शहर विकास आघाडीचे ११तर शिवसेनेचे ६ नगरसेवक असे संख्याबळ आहे. परंतु नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेला १० तर शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना ६ मते पडली होती. तर मानसी डाफळे या नगरसेविकेने नगराध्यक्ष निवडणुकीत स्वतः अर्ज दाखल केल्याने त्यांनी नगराध्यक्ष निवडणुकीत स्वतःला आणि उप नगराध्यक्ष निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.

या प्रकरणी गटनेता संपदा वाघधरे आणि दिलीप मुजावर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची तक्रार दाखल करून लांजा शहर विकास आघाडीतून फुटलेले परवेश घारे, मनोहर कवचे, सुगंधा कुंभार आणि मुरलीधर निवळे यांना पक्षांतर्गत कायद्यानुसार अपत्रात ठरवावे, अशी मागणी केली होती. या तक्रार अर्जावर गेली सात महिने सुनावणी सुरु होती. त्यानंतर तब्बल चार महिन्याने आज जिल्हाधिकारी यांनी निकाल दिला आहे. 

दोन्ही बाजूने म्हणने ऐकल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी व्हीप डावलून शिवसेनेला मतदान केलेल्या चार नगरसेवकांच्या विरोधात महाराष्ट्र स्थानिक  प्राधिकरण  सदस्य अपात्र अधिनियम १९८६ चे कलम ३(१)( ब) नुसार आणि नियम १९८७ मधील नियम ८ प्रमाणे अपात्रतेची निकाल दिला आहे त्याचप्रमाणे परवेश घारे, सुगंधा कुंभार, मुरलीधर निवळे, मनोहर कवचे या चारही नगरसेवकांचे पद रिक्त झाल्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. 

या प्रकरणी अर्जदाराच्या वतीने रत्नागिरीतील प्रसिद्ध अॅड. अविनाश शेट्ये आणि मुंबईतील अॅड. प्रदीप दळवी तर सामनेवाला यांच्या वतीने अॅड. अशोक कदम यांनी काम पाहिले. 

लांजा शहर विकास आघाडीतून फुटून शिवसेनेला मदत करणाऱ्या चार नगरसेवकांना अपात्र ठरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि मित्र पक्षाचा कार्यकर्त्यांत आनंद व्यक्त होत आहे.

Web Title: Four Corporators in Lanja are Declared Ineligible