Photo : ओपीडी बंद केल्याने रुग्णांची झाली घालमेल...

 सचिन माळी
सोमवार, 23 मार्च 2020

मंडणगडात म्हाप्रळ व वेसवी चेक पोस्टवर ५२५४ प्रवासी नागरिकांची तपासणी..चार दिवसांत १०९२ वाहने दाखल; आरोग्य विभाग सतर्क..

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोना पार्श्वभूमीवर मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ व वेसवी चेक पोस्टवर तालुक्यात बाहेरून येणाऱ्या प्रवासी नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. चार दिवसांत १०९२ वाहनांमधून ५२५४ प्रवाशांची तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच आरोग्य यंत्रणेकडील माहितीनुसार ३५ जणांना तपासणीनंतर स्वतःच्या घरीच सुरक्षित होम कोरोन्टाईन करण्यात आले असून त्यांना घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मंडणगड: शहरातील मुख्य चौकात उघड्या दुकानात गर्दी वाढल्याने पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी कारवाईचा बडगा उभारला.

तालुक्यातील आरोग्य विभाग सतर्क असून प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान वेसवी ते बागमांडला फेरी बोट वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. ता.२२ मार्च रोजी जनता कर्फ्युला तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण तालुका शंभर टक्के बंद झाला होता. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून काळजी घेतली जात आहे. ता. २३ मार्च रोजी सकाळी मंडणगड शहरात अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने तुरळक गर्दी दिसून आली. वाहनांची संख्या वाढत गेल्याने व शहरात गर्दी वाढत गेल्याने पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी दुकाने उघडणाऱ्या व उगाचच रस्त्यावर वाहने फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. कारवाईचा बडगा उगारताच त्यामुळे अनेकांनी उघडलेली दुकाने बंद केली. गर्दी ओसरू लागली.

म्हाप्रळ: तालुक्यात येणाऱ्या प्रवासी नागरिकांची तपासणी करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी व पोलीस.

हेही वाचा- रत्नागिरीत संचारबंदी मात्र या सेवांना सुट...

रुग्णांची घालमेल झाली सुरू

तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रभाकर भावठाणकर व गटविकास अधिकारी एम.दिघे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच प्रसार माध्यमांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी हे शहरातील हालचालींवर लक्ष ठेवून असून आक्षेपार्ह आढळल्यास घटनास्थळी भेट देत आहेत. ग्रामीण रुग्णालयात सकाळी रुग्णांनी तपासणी करण्यासाठी धाव घेतल्याने त्याठिकाणी गर्दी झाली. डॉ.आशिष शिरसे यांनी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओपीडी बंद करण्यात आली असून फक्त अत्यावश्यक असेल तरच तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासन, महसूल विभाग, मंडणगड नगरपंचायत प्रशासन, वैद्यकीय विभाग यांनी पेट्रोलिंग करीत परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना घरीच थांबून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा-  ‘त्या’ नेपाळी बाबूंना अखेर काढले शोधून....

ओपीडी बंद केल्याने रुग्णांची घालमेल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयात होणारी गर्दी वाढू नये याकरिता रुग्णालयातील ओपीडी बंद ठेवण्यात आली आहे. तसेच खाजगी दवाखान्यांनाही गर्दी टाळण्यासाठी ओपीडी बंद ठेवावी असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांची घालमेल सुरू झाली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच रुग्णांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. एकीकडे शासन सर्दी, ताप आलेल्या रुग्णांची तपासणी करून घेण्याचे आवाहन करीत असताना दुसरीकडे ही सेवा बंद केल्याने रुग्णांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In four days 1092 vehicles were registered in mandangad kokan marathi news