साखरी नाटे येथे चार मच्छीमारी नौका जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

रत्नागिरी - प्रखर प्रकाश झोताचा (एलईडी लाईट) वापर करून मासेमारी करणाऱ्या चार नौकांवर पोलिस व मत्स्य विभागाच्या संयुक्त गस्ती नौकांनी साखरी नाटे येथे धडक कारवाई केली. या नौका रत्नागिरी, मालवण व राजापूर तालुक्‍यातील असून त्या जप्त केल्या आहेत.

रत्नागिरी - प्रखर प्रकाश झोताचा (एलईडी लाईट) वापर करून मासेमारी करणाऱ्या चार नौकांवर पोलिस व मत्स्य विभागाच्या संयुक्त गस्ती नौकांनी साखरी नाटे येथे धडक कारवाई केली. या नौका रत्नागिरी, मालवण व राजापूर तालुक्‍यातील असून त्या जप्त केल्या आहेत.

प्रखर प्रकाशझोताद्वारे मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे; परंतु परराज्यांतील मच्छीमाराच्या पावलावर पाऊल टाकत रत्नागिरी,  सिंधुदुर्गतील मच्छीमार बंदीचे उल्लंघन करत आहेत. याबाबत पारंपरिक मच्छीमारांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. अवैध मासेमारी विरोधात कारवाईसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पोलिस तटरक्षक आणि मत्स्य विभागाची संयुक्त गस्त सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या.

साखरी नाटे येथे संयुक्त गस्त सुरू असताना काही नौका मासेमारी करताना सापडल्या. त्या नौकांवर अवैधरीत्या जनरेटर आणि एलईडी लाईट्‌सचा वापर होत असल्याचे आढळून आले. संयुक्त गस्ती पथकाने त्या नौका जप्त केल्या. त्यामध्ये गीता सहदेव बापर्डेकर (रा. मेढा ता. मालवण, जि. सिधुदुर्ग) यांची श्री साईप्रसाद १, नियाज दा. मस्तान (रा. साखरी नाटे, ता. राजापूर) याची मुसफेरी, यासीम सोलकर (साखरीं नाटे, ता. राजापूर) यांची अल अजीज, नरहरी नारायण मळेकर (रा. गावडे आंबेर, ता. रत्नागिरी) यांची हेमावती या नौकांचा समावेश आहे.

कारवाई करणाऱ्या गस्ती पथकात सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव पोलिस उपनिरीक्षक मनोजकुमार सिह, प्रकाश सारंग, बारक्‍या कोलथकर, दिनेश हरचकर, तुषार कंरगुटकर, सुनील झापडेकर, दीपक काळे आणि जीवन सावंत आणि अन्य सहकाऱ्यांनी कारवाई केली.

चारही नौका जप्त केल्या असून नौका मालकांविरोधात राजापूर अधिकारी यांच्याकडे प्रभावी कारवाईसाठी दावे दाखल करण्यात आले आहेत.
- आनंद पालव,
सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय

Web Title: Four fishermen boat seized at Sakri Nate