पणतुर्लीत चारशे कलमांच्या बागेची कत्तल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

दोडामार्ग - पणतुर्ली येथील शेतकरी उल्हास घोगळे यांच्या बागायतीतील चार वर्षांची ४०० काजू कलमे अज्ञातांनी आज सकाळी कोयत्याने तोडली. उतारवयात काजू बागायतीत गुंतवणूक करून जगण्याची सोय करू पाहणाऱ्या घोगळे दांपत्याच्या आशेवर यामुळे पाणी पडले आहे.

दोडामार्ग - पणतुर्ली येथील शेतकरी उल्हास घोगळे यांच्या बागायतीतील चार वर्षांची ४०० काजू कलमे अज्ञातांनी आज सकाळी कोयत्याने तोडली. उतारवयात काजू बागायतीत गुंतवणूक करून जगण्याची सोय करू पाहणाऱ्या घोगळे दांपत्याच्या आशेवर यामुळे पाणी पडले आहे. जमीन वादातून हा प्रकार घडल्याचा त्यांचा संशय आहे. त्यांनी पाच जणांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात तक्रारही केली आहे. 

श्री. घोगळे पोलिसपाटील आहेत. सहा-सात महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांचे दोन्ही मुलगे कुटुंबासह परगावी राहतात. निवृत्तीनंतर कुणासमोर हात पसरावे लागू नयेत म्हणून त्यांनी चार वर्षांपूर्वी बहिणीच्या नावावरील जमीन कुलअखत्यारपत्र करून घेऊन दोन हेक्‍टर चोवीस गुंठ्यामधील नव्वद गुंठ्यात काजू कलमे लावली. त्यांनी आपल्या नावावरील चौदा गुंठे विक्री केल्याने त्यांचे नाव सातबारामधून कमी झाले, पण फेरफार आणि वारसा हक्कानुसार त्यांच्या एकूण जमिनीत पन्नास टक्के वाटा आहे. त्यांचे चुलत भाऊ व पुतणे यांच्यापैकी दोघांनी काजू लागवड केलेल्या उल्हास यांच्या जमिनीत आपला हक्क असल्याचा दावा करुन तहसीलदारकडे अर्ज केला होता.

त्यावर काल चौथ्यांदा सुनावणी झाली. त्यावेळी नायब तहसीलदारांनी त्यांना तुम्ही वाद करू नका, तुमचा हक्क सिद्ध करून कायदेशीर मार्गाने जमीन ताब्यात घ्या, असा सल्ला दिला होता. त्याला चोवीस तास उलटायच्या आत काजू बागायतीतील ४०० कलमांचा निर्दयीपणे कत्तल झाली. या प्रकरणी पोलिसांमध्ये दिलेल्या अर्जात त्यांनी पाच जणांवर संशय व्यक्‍त केला आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान सगळी काजू कलमे कोयत्याने सपासप तोडून टाकली आणि अख्खी बागच नाहीशी केली गेली.

सकाळी दहाच्या दरम्यान पती पत्नी बागेत पोचले आणि कापून टाकलेली कलमे पाहून त्यांच्या काळजात चर्र झाले. चौकशी करता त्या पाच जणांची नावे पुढे आली. त्यांनी कृत्याची कबुलीही दिली असे उल्हास यांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठले आणि रीतसर तक्रार केली. पोलिसांनी त्या पाचही संशयितांना पोलिस ठाण्यात बोलावले आहे.

माणुसकीवरच घाव
चार वर्षे मुलाबाळांप्रमाणे सांभाळलेली कलमे कापलेल्या अवस्थेत पाहून उल्हास हे कोलमलडले. न्याय प्रविष्ट प्रकरण असताना हे कृत्य करणे योग्य नाही. त्यांनी मला सांगितले असते तर मी त्यांना बागही दिली असती किंवा निकालानंतर त्यांच्या बाजूने निर्णय झाला असता तर बाग त्यांना मिळाली असती,पण त्यांनी असे करणे माणुसकीला धरुन नाही असे उल्हास यांनी हताशपणे सांगितले.

Web Title: four hundred cultivated tree cutting in Panturli