समुद्रात साकारला चारशे फूट तिरंगा, अनोखी सलामी 

प्रशांत हिंदळेकर
Tuesday, 26 January 2021

तीन बोटीद्वारे सुमारे तीन किलोमीटर आत समुद्रामध्ये गेल्यानंतर येथील दांडी बीच समुद्रामध्ये सुमारे 400 फुट लांब तिरंगा निसर्गापुरक रंग व मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा साकारला.

मालवण (सिंधुदुर्ग) - प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला येथील दांडी बीच समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ समुद्रात तीन बोटीच्या मदतीने 400 फुट लांब तिरंगा बनवून अनोखी सलामी देण्यात आली. लोणंदचे सुपुत्र एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी ही सलामी दिली. श्री. परदेशी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी ऍडव्हेंचर छायाचित्रकार मेहुल ढवळे, वनरकक्षक विश्‍वास मिसाळ, राहुल परदेशी यांच्यासह येथील अन्वय अंडरवॉटर सर्विसेसचे रूपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, रश्‍मीन रोगे, नारायण रोगे यांचे सहकार्य लाभले. 

तीन बोटीद्वारे सुमारे तीन किलोमीटर आत समुद्रामध्ये गेल्यानंतर येथील दांडी बीच समुद्रामध्ये सुमारे 400 फुट लांब तिरंगा निसर्गापुरक रंग व मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा साकारला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आगळी वेगळी सलामी देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने वायुसेनेचे जवान हवेत विमानाच्या मदतीने धुर सोडुन हवेत तिरंगा निर्माण करून सलामी देतात याच पद्धतीची सलामी समुद्रातील पाण्यामध्ये देण्यात आली. यापूर्वीही प्राजित परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 15 ऑगस्ट 2019 ला 321 फुटाची भव्य तिरंगा रॅली लोणंदमध्ये काढली होती. मागील वर्षी सिंहगडावर 350 फूट भगवी रॅली काढून तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती. तीन महीन्यापूर्वी कळसुबाई शिखरावर तिरंगा ध्वजच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला होता. येथील समुद्रामध्ये काही दिवसांपूर्वी 321 फूट तिरंगा फडकाविला होता. 

मालवण किनारा घोषणांनी दणाणला 
कोणत्याही देशाचा 400 फुट लांब एवढा मोठा तिरंगा पाण्यामध्ये रंगांद्वारे तयार करण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी, असा दावा करण्यात आला आहे. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने मालवणचा समुद्रकिनारा दुमदुमुन गेला होता. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four hundred feet tringa unique salute malvan konkan sindhudurg