चार वर्षीय बालकाचा आगीत होरपळून मृत्यू

संतोष पेरणे
रविवार, 24 मार्च 2019

कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील एका चार वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाला. 

नेरळ (जिल्हा रायगड) : कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील एका चार वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाला. बंद असलेल्या गाडीने अचानक पेट घेतला. यामध्ये अभय उमेश बुंधाटे या बालकाचा मृत्यू झाला. 

उमरोली येथे एमएच 02 एनए 5625 ही मारुती झेन गाडी गावातील रस्त्यावर उभी होती. त्या गाडीच्या काचा खुल्या असल्याने त्यात त्या भागातील लहान मुले गाडीमध्ये जाऊन खेळत असायची. 22 मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास येथील एका गाडीला आग लागली. गाडीने का पेट घेतला याबाबत कोणतेही माहिती नव्हती. मात्र, त्या गाडीशेजारी राहणाऱ्या महिलांनी आरडाओरड केली असता स्थानिक नागरिकांनी बोअरवेल सुरू करून त्या पाण्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीच्या मागील सीटवर अभय हा चार वर्षीय मुलगा आगीत होरपळल्याने ओरडत होता. ग्रामस्थांनी लागलीच त्याला उचलून डिकसळ येथे असलेल्या रायगड रुग्णालयात उपाचारांसाठी दाखल करण्यात आले.

चार वर्षीय बालक भाजल्याने त्याला रायगड रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास नवी मुंबईत असलेल्या ऐरोली भागातील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी पाठवले. स्थानिक ग्रामस्थांनी अभयला रात्री ऐरोली येथे नेले. मात्र, दुसऱ्या दिवशी 23 मार्च रोजी सकाळी अभय उमेश बुंधाटे या चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

याबाबत ऐरोली येथील पोलिस ठाण्यात बर्न रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. मात्र, कर्जत पोलिस ठाण्यात दोन दिवस उलटले तरी गुन्हा दाखल झाला नाही. तीन महिने उभ्या असलेल्या बंद गाडीला अचानक आग लागते आणि त्यानंतर त्या गाडीत खेळत असलेला मुलाचा आगीत मृत्यू होतो. 

ऐरोली बर्न रुग्णालयाशी संबंधित असलेल्या ऐरोली पोलिस ठाण्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जत पोलिस कारवाई करणार आहेत. मात्र, लहान बालकाच्या आगीत होरपळून झालेल्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, अर्धवट जळालेल्या अवस्थेत असलेली कार अजूनही त्याच ठिकाणी पडून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four years old child died in Fire