घरावर करणी केल्याचे सांगत पैसे उकळणारा बाबा ताब्यात

घरावर करणी केल्याचे सांगत पैसे उकळणारा बाबा ताब्यात

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील नांदगाव येथील महिलेला घरावर करणी केल्याचे सांगत 2 लाख 38 हजारांचा गंडा घालत आर्थिक फसवणूक करणाऱ्या बंगाली बाबाच्या मुसक्या बाणकोट पोलिसांनी पाच दिवसांत आवळल्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातून त्यांचा ठावठिकाणा हुडकून आझाद मलिक उर्फ सुलतान बंगाली बाबा व साथीदार भाऊ शहजाद मलिक या दोघांना अटक करण्यात आली. बाणकोट पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे कौतुक होत आहे.

नांदगाव येथील आश्विनी खाडे यांच्या मोबाईलवर बंगाली बाबा नामक व्यक्तीने फोन करून तुझ्या घरावर करणी करण्यात आली असून, काळया विद्येचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. करणीमुळे नवऱ्याला त्रास होत आहे. तसेच घरावर मोठे संकट येणार आहे, असे सांगत हे संकट मीच दूर करू शकतो असा उपाय सुचवला व त्यावरील उपाययोजनेकरीता होणारा खर्च तुला करावा लागेल असे सांगितले. घाबरून याला बळी पडून आश्विनी खाडे यांनी सुलतान बंगाली बाबाच्या नावाने बॅंक आॅफ बडोदा व स्टेट बॅंक आॅफ इंडियामधील खात्यात 2 लाख 38 हजार 500 रूपये ता. 19 डिसेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान भरले. त्यासाठी सदर महिलेने दागिणे गहाण ठेवून व उधार उसने घेवून बाबाच्या खात्यात पैसे भरले.

काही दिवसानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच 12 जानेवारी 2019 रोजी बाणकोट सागरी पोलिस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोध कार्यास सुरवात केली. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. सदरची फसवणूक करणारी व्यक्ती ही मुंबई मध्ये झवेरी बाजार लगत असणाऱ्या महंमद अली रोड, पायधुनी व अब्दुल रहेमान स्ट्रीट या गजबजलेल्या परिसरात असल्याची कुनुक लागली.

रत्नागिरी पोलिस अधीक्षक मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाने, बाणकोट पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी.डी.पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. महाडिक, आंबुलकर, डी.डी.राणे यांनी सापळा रचला.

पोलिसांनी मोठ्या शिताफीने आझाद मलिक उर्फ सुलतान बंगाली बाबा व शहजाद मलिक (मूळगाव मेरठ, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांना १८ जानेवारी रोजी खेड न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी पोलिस कोठडी मागण्यात आली. न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com