मालवाहतूकदार अडचणीतच; गाडे अद्याप रुळावर नाही

Freighters in trouble
Freighters in trouble

चिपळूण - टाळेबंदी शिथिलीकरणाच्या प्रक्रियेला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी मालवाहतूक व्यवसायाचे गाडे अद्याप रुळावर आलेले नाही. गेले दोन महिने केवळ १० टक्के व्यवसाय चालू आहे. 

औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांसाठी परदेशातून येणारा कच्चा माल बंदरापर्यंत येतो. तेथून ट्रकने कारखान्यांपर्यंत पोहोचवला जातो. गाणे खडपोली, लोटे आणि खेर्डी एमआयडीसीत उत्पादन होणारा माल मुंबई, पुणे, कर्नाटक, गोवा येथे ट्रकने पाठवला जातो. चिपळूण, खेड दापोलीतील ४५० हून अधिक ट्रक आणि एक हजारहून अधिक लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. टाळेबंदीच्या सुरवातीच्या काळात ट्रकने जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीचा वाटा केवळ १५ ते २० टक्के इतकाच होता. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर दोन महिन्यांत ऑगस्टच्या सुरवातीला मालवाहतुकीत २० ते २५ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. गेल्या दोन महिन्यांत त्यामध्ये आणखी २० टक्‍क्‍यांची वाढ झाली. मात्र औद्योगिक उत्पादन बंद असल्यामुळे ट्रकचालक अडचणीत आले आहेत. लोटे, गाणेखडपोली आणि खेर्डीतील बहुतांशी कारखान्यांना लागणारा कच्चा माल चीनमधून येतो. कच्चा माल उपलब्ध होत नसल्यामुळे कारखानदारांनी आपले उत्पादन थांबवले आहे. काहींनी कामगार कपात केली आहे. पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नसल्यामुळे मालवाहू वाहनांची मागणी घटली आहे.

 लोटेतून पूर्वी दररोज ४० ते ५० ट्रक भरून देशातील विविध भागात माल जायचा. आता दिवसात जास्तीत जास्त १० ट्रक माल भरला जातो. त्यामुळे ट्रकचालक अडचणीत आहेत. अनेकांनी कर्ज घेऊन ट्रक घेतले आहेत. हप्ते न भरण्याची सवलत रद्द झाल्यानंतर वाहतूकदारांच्या अडचणीत भर पडली आहे. यापुढील काळात हा व्यवसाय कसा सावरेल, याबाबत अद्याप कसलीच स्पष्टता नाही. 

- बुवा सावंत, अध्यक्ष, चिपळूण-खेड तालुका वाहतूक व्यावसायिक संघ

कारखान्यातील माल ट्रकमध्ये भरण्यासाठी तसेच उतरवण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारचे कामगार होते. ते गावी गेल्यापासून मजुरांची अडचण आहे. काही कामगार परतले आहेत; पण लांबचा प्रवास करण्याची कोणाची मानसिकता नाही. त्यामुळे मजुरांचा प्रश्‍न कायम आहे.
- सुनील उतेकर, मालवाहतूकदार, लोटे


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com