कौतुकास्पद! गणेशोत्सवात `या` पारंपरिक लोककलेला उर्जितावस्था

अजय सावंत
Monday, 31 August 2020

कोकणात विशेषतः श्रींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर त्यांचे दीड दिवसांपासून ते 5, 7, 11, 21, 42 दिवस अशाप्रकारे घरोघरी मुक्काम असतो. सार्वजनिक गणेशोत्सव हा सुद्धा काही ठिकाणी 21 किंवा 42 दिवस असतो.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोकणात सर्वांचे आराध्य दैवत श्री गणेशासमोर पारंपरिक लोककला असणारी फुगडी घालण्याची कला आजही बऱ्याच गावांमध्ये सुरू आहे. ही लोककला अजूनही काही गावांमध्ये अजून मनोभावे जोपासली जात आहे. 
कोकणवासीयांचे आराध्य दैवत म्हणून श्री गणेश ओळखला जातो. कोकणात विविध सर्व सणांमध्ये गणेशोत्सव हा सण सर्वांत मोठा मानला जातो.

कोकणात विशेषतः श्रींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर त्यांचे दीड दिवसांपासून ते 5, 7, 11, 21, 42 दिवस अशाप्रकारे घरोघरी मुक्काम असतो. सार्वजनिक गणेशोत्सव हा सुद्धा काही ठिकाणी 21 किंवा 42 दिवस असतो. गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशाची मनोभावे सेवा करण्याच्या उद्देशाने भजन, आरतीचा कार्यक्रम सर्वत्र मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणात केला जातो. या भजन व आरती बरोबरच कित्येक वर्षांची फुगडी ही लोककलाही जोपासली जात आहे.

सद्यस्थितीत पारंपरिक फुगड्या कमी प्रमाणात दिसून येत असून आधुनिक फुगड्यांचे प्रमाण वाढले आहे. पारंपरिक फुगडी लोककला जतन करण्याचे काम ग्रामीण भागातील अनेक महिला मंडळ करत आहेत. ही निश्‍चितच कौतुकास्पद बाब आहे. ही कला गेल्या काही वर्षापूर्वी बंद होण्याच्या मार्गावर होती; मात्र जिल्ह्यातील विविध संस्था, मंडळे, राजकीय पक्ष यांनी फुगडी या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून संधी दिल्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी बंद झालेली ही कला पुन्हा बहरू लागली आहे.

या कलेला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे; मात्र गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशासमोर आजच्या मोबाईलच्या युगात ही फुगडी सादर करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. ही पारंपरिक फुगडी लोककला एक मनोरंजनाचे माध्यम ठरली आहे. ही कला गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशाची सर्वत्र धामधूम सुरू असताना ग्रामीण भागातही दिसून येत आहे. 

बाप्पाच्या सेवेचा आनंद 
तालुक्‍यातील नेरूर कांडरीवाडी येथील नाईक कुटुंबियाचा गणेश हिरक महोत्सवी वर्षात वाटचाल करीत आहे. या कुटुंबातर्फे गणपतीसमोर दरवर्षी फुगडी घातल्या जातात. या फुगडीमध्ये नाईक घराण्यातील नेरुरच्या महिलांसह मुंबईतील महिला वर्गाचाही सहभाग असतो. या कुटुंबातील मधुश्री नाईक, रूपाली नाईक, सुनिता नाईक, प्रमिला नाईक, सुखदा नाईक, सुप्रिया नाईक, आकांक्षा नाईक, सायली नाईक, मिलन नाईक, ओम नाईक, आराध्या आदींनी फुगड्या घातल्या. श्रींसमोर पारंपरिक फुगड्या घालून त्यांची मनोभावे सेवा केल्याचा आनंद मिळत असल्याचे मधुश्री नाईक यांनी "सकाळ'ला सांगितले.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fugdi art in konkan sindhudurg