निधी पर्यटनस्थळ विकासाला; रस्त्याला नाही

संदेश सप्रे
मंगळवार, 3 जानेवारी 2017

देवरूख - क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्राचा विकास झाला खरा; पण यातून संबंधित स्थळाकडे जाण्यासाठी पक्‍का रस्ताच मिळत नाही. त्यामुळे लाखो शिवभक्‍तांना श्रद्धास्थानापर्यंत जाण्यासाठी पक्‍का रस्ताच नाही. दरवर्षी पावसाने होणारी रस्त्याची दुरवस्था आणि डागडुजीसाठी खर्च होणारे लाखो रुपये हा त्याच्यावरचा कायमस्वरूपी उपाय नव्हे. मार्लेश्‍वरला जाण्यासाठी पक्‍का आणि रुंद रस्ता कधी होणार, असा प्रश्‍न पर्यटकांना पडला आहे. 

देवरूख - मुरादपूर - बामणोली-कळकदरा हा प्राथमिक जिल्हा मार्ग क्र. ४७ देवरूख-मार्लेश्‍वर या नावाने प्रसिद्ध आहे. मार्लेश्‍वरला जाण्यासाठी भाविक या मार्गाचा अवलंब करतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या देवस्थानाला नियमित शेकडो भाविक भेट देतात. मार्लेश्‍वर पर्यटन क्षेत्र क वर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. क वर्गासाठीच्या नियमानुसार प्रत्यक्ष स्थळावर विकासकामे करण्यासाठी निधी मिळतो; मात्र या स्थळापर्यंत जाणाऱ्या मार्गाची डागडुजी करण्यासाठी त्यातून निधी मिळत नाही. त्यामुळेच बांधकाम विभाग गेली चार वर्षे विविध ठिकाणच्या फंडातून निधी वापरत या मार्गाची दरवर्षी डागडुजी करते. गेल्या ४ वर्षांत या मार्गाच्या डागडुजीसाठी तब्बल ४० लाखांपेक्षा जास्त निधी खर्च झाला; मात्र मार्गाची दुरवस्था जैसे थे आहे.

हा संपूर्ण मार्ग एकेरीच आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एकाच वेळी दोन छोटी वाहने जातानाही चालकांना कसरत करावी लागते. यातून किरकोळ अपघात होतात व चालकांमध्ये बाचाबाची होते. किरकोळ अपघातांचे प्रकार वाढतच आहेत. गेली अनेक वर्षे हा मार्ग रूंद करावा, अशी मागणी होत आहे; मात्र शासनाकडून त्याकडे दुर्लक्षच झाले आहे. परिणामी स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबतीत लक्ष घालून येथील रस्त्याच्या दुपदरीकरणासाठी आवश्‍यक ते प्रयत्न करावेत, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

अपघाताला निमंत्रण
गेल्या तीन वर्षांत अरुंद रस्त्यामुळे या भागात होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. नियमित घडणारे किरकोळ अपघात वगळता तीन वर्षांत या मार्गावर ७ मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये ५ जण ठार, तर २५ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. यावरून रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज अधोरेखित होते.
 
पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा पर्यटन विकासासाठी जो निधी उपलब्ध केला आहे, त्यात मार्लेश्‍वर रस्त्यासाठीच्या निधीची तरतूद झाली आहे. पुढील वर्षापर्यंत हा मार्ग कायमस्वरूपी चकाचक आणि रुंद होण्याची अपेक्षा आहे. 
- प्रसाद सावंत, विश्‍वस्त, मार्लेश्‍वर देवस्थान ट्रस्ट

Web Title: fund tourism place development