वझरेत रंगला पारंपरिक गाडा उत्सव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

दोडामार्ग - सुष्टांनी दुष्टांवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणजे वझरेचा गाडा उत्सव. सत्ता आणि पैसा यामुळे उन्मत्त झालेल्या मेशांचा गनिमी काव्याने नायनाट करून मिळविलेल्या विजयानंतरचा आनंदोत्सव आणि जल्लोष म्हणजे गाडा उत्सव. पारंपरिक पद्धतीने तो गाडा उत्सव वझरेत मंगळवारी (ता.१४) झाला. वझरेतील तो अनुपम सोहळा हजारो भाविकांनी आणि पैपाहुण्यांनी अनुभवला.

शेकडो वर्षांपूर्वी मेशे समाजाकडून वझरेतील स्थानिकांवर जुलूम केला जायचा. अनन्वित अत्याचाराविरोधात दंड थोपटायचे तर त्यांची ताकद मोठी. त्यांच्याशी चार हात करणे महाकठीण. त्यामुळे वझरेतील गवस कुटुंबीयांनी आजूबाजूच्या गावांतील पैपाहुण्यांना एकत्र आणून गनिमी काव्याने त्यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. खलबते झाली, डाव रचला गेला. गावातील एका महिलेला मेशांकडे मोलकरीण म्हणून पाठविण्यात आले. संधी साधून तिने त्यांच्या शंभराहून अधिक बंदुकांमध्ये पेज ओतली आणि त्या निकामी केल्या. काम फत्ते झाल्याचा संदेश आला आणि या सर्वांनी मिळून मेशांच्या वस्तीवर हल्ला केला. सर्वांना कापून काढले आणि त्यांचे मृतदेह खटारा (लाकडी) गाडीतून गावात आणून जल्लोष केला. त्याचे प्रतीक म्हणून शेकडो वर्षानंतरही आज वझरेत तो गाडा ओढला जातो.
लाकडाची भलीमोठी चाके असलेला लाकडी गाडा पूर्ण सजवला जातो. गिरोडे, वझरे, मये, माटणे येथील सर्वजण आणि मानकरी प्रथेप्रमाणे रोंबाट, गाऱ्हाणे, पूजाअर्चा करून गाडा ओढतात. गाड्यावर झोपलेली माणसे म्हणजे मेशांचे मृतदेह मानले जातात. त्यांच्यासह गाडा कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला खेचून आबालवृद्ध विजयोत्सव साजरा करतात. अनेक पिढ्यांकडून पुढे सरकत आलेला विजयाचा इतिहास गाडा उत्सवाच्या निमित्ताने पुन्हा ताजातवाना केला जातो. खलप्रवृत्तीचा बीमोड करायचा तर एकीचे बळ हवे, असा संदेश या गाडा उत्सवातून दिला जातो. वझरेचा रथोत्सव किंवा गाडा उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक, पैपाहुणे गावागावांतून दाखल होतात. तेथील सातेरी मंदिराचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.

Web Title: gada utsav in vajhare