esakal | गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य़़; पण सोशल डिस्टन्सचे तीन तेरा... कुठल्या जिल्ह्यात घडतयं!
sakal

बोलून बातमी शोधा

द

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यंदा अनेक भाविकांनी 11 ऐवजी पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याला प्राधान्य दिले आहे.

गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य़़; पण सोशल डिस्टन्सचे तीन तेरा... कुठल्या जिल्ह्यात घडतयं!

sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली : कोरोना महामारीचे संकट आणि पावसाची संततधार असली तरी अपार ऊर्जा आणि उत्साह आणणाऱ्या गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. मखर, फुले, दिव्यांच्या माळा, दिवे, कागदी व कापडी तोरण, हार, पूजेचे आणि नैवेद्याच्या साहित्याची प्राधान्याने खरेदी होत आहे. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचे तीन तेरा वाजत असले तरी आता कोरोनाला धैर्याने सामोर जायचे आहे, अशी जबर इच्छाशक्‍ती लोकांमध्ये दिसून आली. गेले पाच महिने भय, काळजी, चिंता असे कोरोनामय वातावरण सणात दूर झाल्याने व्यापारी बांधवांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. 

कोरोना महामारीमुळे जीवनावश्‍यक वस्तू वगळता कपडे, इलेक्‍ट्रॉनिक, इलेक्‍ट्रिकल व इतर साहित्याची आवक मार्चपासूनच ठप्प झाली होती. मुंबई, ठाणे परिसरात कोरोना विळखा तीव्र असल्याने सर्व वस्तूंची खरेदी रोखीने करावी लागत होती. परिणामी जिल्ह्यातील बाजारपेठांतही बहुतांश साहित्याची टंचाई होती. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर व्यापारी बांधवांनी धोका पत्करून सजावटीसह इतर साहित्य बाजारपेठांत आणले; मात्र अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदी व्यतिरिक्‍त ग्राहक बाजारपेठांत फिरकत नसल्याने व्यापाऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. दोन दिवसात बाजारपेठातील हे चित्र बदलले असून उत्साही वातावरणाची प्रचिती येऊ लागली आहे. विविध प्रकारचे मखर, फुले, कागदी, प्लास्टिक आणि कापडी तोरणे, हार आदी वस्तूंना ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याची माहिती सजावट विक्रेते पपी उचले यांनी दिली. फटाक्‍यांची खरेदी देखील ग्राहकांकडून केली जात आहे. चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर नवीन माल आल्याने कापड, भांडी दुकानांमध्येही ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. 

गणेशोत्सव सजावट आणि विद्युत रोषणाईच्या साहित्यामध्ये यंदा नावीन्य दिसले नाही. चिनी वस्तूंच्या बहिष्काराची मोहीम सुरू असल्याने मुंबई, ठाणे येथील होलसेल विक्रेत्यांकडून जुन्याच आणि शिल्लक माल आणावा लागला असल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी दिली. जिल्ह्यातील गणेशमूर्ती शाळेतही गजबज वाढली आहे. मूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात असून कलाकार अखेरचा हात फिरवण्यात मग्न आहेत. कालपासून भाविकांनी मूर्ती घरी न्यायला सुरुवात केली आहे. 

बाजारपेठांत गर्दी, मात्र उलाढाल कमी 
पूर्वसंध्येला बाजारपेठांत गर्दी असली तरी दरवर्षीपेक्षा उलाढाल कमी आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यंदा अनेक भाविकांनी 11 ऐवजी पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याला प्राधान्य दिले आहे. याखेरीज भजन, डबलबाऱ्या आदींचेही कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातील विविध प्रकारचे नैवेद्य, प्रसाद आणि जेवणावळींची रेलचेल कमी असणार आहे. त्यामुळे दरवर्षी पेक्षा ग्राहकांकडून कमी खरेदी होत असल्याची माहिती किराणा व्यावसायिक प्रथमेश चव्हाण यांनी दिली. 

परजिल्ह्यातील विक्रेत्यांची पाठ 
गणेशोत्सव सणात सजावटीचे साहित्य घेऊन परजिल्ह्यातील विक्रेते दाखल होतात. पखवाज, ढोलकी सजविण्यासाठी पंढरपूर व इतर भागांतून कारागीर जिल्ह्यातील बाजारपेठांत दाखल होतात. यंदा कोरोनामुळे त्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाद्य दुरुस्ती करणाऱ्या स्थानिक कारागिरांवर ताण आला आहे. 

संपादन : विजय वेदपाठक

loading image
go to top