esakal | गणपतीपुळे: संकष्टीलाही कळस दर्शनावरच समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीपुळे

गणपतीपुळे: संकष्टीलाही कळस दर्शनावरच समाधान

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोरोनाची परिस्थिती निवळली असली तरी अजूनही राज्य शासनाने मंदिरे बंद ठेवली आहेत. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळेतील गणपतीचे मंदिर बंदच आहे. शुक्रवारी (ता. २४) संकष्टी असल्यामुळे गणपतीपुळेत येणार्‍या भक्तांना श्रींचे दर्शन घेण्यासाठी प्रवेशद्वारावरच ऑनलाइन व्यवस्था केली होती. त्यावर श्री गणपतीचे दर्शन घेऊन भक्त निघून जात होते. काहींनी मंदिराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोरून कळस दर्शनावर समधान मानले.

कोरोना कालावधीतील निर्बंध सप्टेंबर महिन्यात शिथिल झाल्यानंतर गणपतीपुळेसह विविध किनारी भागात पर्यटकांचा राबता सुरू झाला. शनिवारी, रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या अधिक असते. शासनाने तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिरे दर्शनासाठी खुली केलेली नाहीत. मंदिरे सुरू झाली तर गर्दी वाढेल आणि त्यामधून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ शकतो. त्यामुळे गणपतीपुळेतील श्री गणेशाचे मंदिरही बंदच आहे. मागील महिन्यातील अंगारकी चतुर्थीला तर मंदिर परिसरातही जाण्यास मनाई केली होती.

मोजकेच भक्त येत असल्यामुळे येथे गर्दी होत नाही. भाविकांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समितीने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठा टीव्ही स्क्रीन लावला आहे. त्यावर थेट गाभार्‍यातील मूर्तीचे दर्शन शक्य होते. गेले काही दिवस या सुविधेवर भक्तगणांनी समाधान व्यक्त केले आहे. दिवसाला साधारण पाचशे भक्त दर्शनासाठी येतात. स्क्रीनवरुन दर्शन म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे असून प्रत्यक्षात गणपती मंदिर लवकरच सुरू व्हावे, असे साकडेही अनेक पर्यटकांकडून घातले जात आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! सात ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडणार

व्यावसायिकांची निराशा

संकष्टीमुळे पर्यटकांची संख्या वाढेल असा व्यावसायिकांचा अंदाज होता; मात्र शुक्रवारी दुपारपर्यंतच भक्त होते. त्यानंतर किनार्‍यावर अवघे दहा ते पंधरा पर्यटक होते. त्याचा किनार्‍यावरील व्यावसायिकांना म्हणावा तसा फायदा झालेला नाही. पर्यटक कळस दर्शनानंतर निघून जात होते.

"संकष्टीला गणपतीपुळे पर्यटक येण्याची शक्यता होती. आलेला पर्यटक जास्तवेळ किनार्‍यावर थांबत नव्हता. त्यामुळे कोरोनानंतरची स्थिती सुधारेल,ही आशा विफल ठरली."

- किसन जाधव, व्यावसायिक

loading image
go to top