esakal | गणपतीपुळेत 2 ठिकाणी 'नो स्विमिंग झोन'
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीपुळेत 2 ठिकाणी 'नो स्विमिंग झोन'

चार दिवसांपूर्वी सांगलीतील एका पर्यटकाचा गणपतीपुळे किनारी बुडून मृत्यू झाला तर एकाला जीवरक्षकांनी वाचवले.

गणपतीपुळेत 2 ठिकाणी 'नो स्विमिंग झोन'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणपतीपुळेत बुडून मृत्यू होऊ नये, यासाठी पोहण्यास धोकादायक असलेल्या दोन ठिकाणी लाल रिबिन लावून 'नो स्विमिंग झोन' बनवण्यात आले आहेत. भरतीवेळी पाण्यात चाळ तयार होते आणि त्यात पर्यटक अडकून बुडतात. पोहणाऱ्‍यांच्या सुरक्षेसाठी हे झोन बनवले असून किनाऱ्‍यावर दहा जीवरक्षकांची नियुक्ती ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी सांगलीतील एका पर्यटकाचा गणपतीपुळे किनारी बुडून मृत्यू झाला तर एकाला जीवरक्षकांनी वाचवले. सध्या समुद्र खवळलेला असल्याने पोहणे धोकादायक आहे. मागील तीन वर्षात बुडून मृत पावल्याच्या घटना घडलेल्या नव्हत्या. कोरोनामुळे सध्या मंदिरे बंद आहेत. पर्यटनाला खिळ बसली असली तरीही काही पर्यटकांचा दौरा होतो आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जयगड पोलिस ठाणे, गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चा झाली. बैठकीनंतर दोन दिवसात उपाय केले गेले.

हेही वाचा: पंजाबनंतर राज्यस्थानमध्येही राजकीय भूकंप? पायलट-राहुल गांधीमध्ये चर्चा

दरम्यान, चाळ तयार होण्याची ठिकाणे बदलत असल्याने नो स्विमिंग झोन बदलतात. ती जबाबदारी जीवरक्षकांवर सोपवली आहे. सोमवारी (२०) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारापूर्वी झेंडे रोवले होते. त्याच्या बाजूला काही अंतरावर खड्डा पडला. ही बाब जीवरक्षकांच्या लक्षात आली होती. सुदैवाने पर्यटकांची संख्या कमी असल्याने त्या भागात कोणीच पोहायला गेलेले नव्हते.

समुद्र खवळलेला; बोटिंग सेवा बंद

भविष्यात एकाही पर्यटकाचा बुडून मृत्यू होणार नाही, याची काळजी पोलिस, ग्रामपंचायत आणि देवस्थान घेत आहेत. दोन पाळ्यातमध्ये दहा जीवरक्षक नेमले आहेत. दरम्यान, किनाऱ्‍यावरील बोटींगसेवा सुरू होईपर्यंत जीवरक्षकांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे. बोटिंग सुरू झाले की आपत्तकाळात सहज मदत मिळते. सध्या समुद्र खवळलेला आणि कोरोनामुळे बोटिंग सेवा बंद आहे.

हेही वाचा: शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत - अनंत गिते

भरती-ओहोटीचे वेळापत्रक लावणार

किनाऱ्‍यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते, ते खराब झाले आहेत. देवस्थान किंवा ग्रामपंचायतीतर्फे ते बसविण्यात येणार आहेत तसेच गणपतीपुळे देवस्थानकडून किनार्‍यावर भरती-ओहोटीचे वेळापत्रक पर्यटकांच्या माहितीसाठी लावण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.

"गणपतीपुळे किनाऱ्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना केल्या आहेत. जीवरक्षकांमुळे अनर्थ टळतो. सध्या रेड झोन तयार करून पर्यटकांना पोहण्यास परावृत्त केले जात आहे."

- महेश केदारी, उपसरपंच

तो भागही नो स्विमिंग झोनमध्ये समाविष्ट

भरती-ओहोटीच्या वेळेनुसार समुद्रात खड्डा तयार होतो आणि त्यात पर्यटक सापडल्यास दुर्घटना घडते. सर्वसाधारणपणे हे प्रकार मंदिराच्या समोरील शंभर मीटरच्या भागात घडतात. तेथे लाल झेंड रोवून रिबिन लावण्यात आल्या आहेत. किनाऱ्‍यावरील वॉच टॉवरजवळही असे प्रकार होतात. तो भागही नो स्विमिंग झोनमध्ये समाविष्ट केला आहे तसेच एटीडीसीच्या मागील बाजूसही या पद्धतीने झोन बनविण्यात येणार आहे.

हेही वाचा: 'हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय, महंत गिरींच्या मृत्यूची CBI चौकशी करा'

एक दृष्टीक्षेप..

  • सध्या समुद्र खवळलेला असल्याने पोहणे धोकादायक

  • पर्यटनाला खिळ तरीही काही पर्यटकांचा होतो दौरा

  • भरती-ओहोटीच्या वेळेनुसार समुद्रात तयार होतो खड्डा

  • खड्डयात पर्यटक सापडल्यास घडते दुर्घटना

  • विशिष्ट ठिकाणी लाल झेंड रोवून लावल्या रिबिन

  • बोटींगसेवा सुरू होईपर्यंत जीवरक्षकांवर जबाबदारी

loading image
go to top