Loksabha 2019 : नामसाधर्म्यमुळे सर्वसामान्य उमेदवारांना मिळतेय ओळख

सुनील पाटकर
गुरुवार, 11 एप्रिल 2019

रायगडात प्रमुख पक्षाचे उमेदवार कोण आहेत? याचा अंदाज घेऊन नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराचा शोध सुरु होतो. केवळ नाव सारखे असलेल्या या व्यक्तीला महत्व येते. पक्षाशी एकनिष्ठ असलेले इर्षेने तर काहीजण चांगले मानधनही वाट्याला येते यामुळे रिंगणात उतरतात.

लोकसभा 2019
महाड : नावात काय आहे? असे प्रसिध्द कवि शेक्सपिअरने जरी म्हटले असले तरी सर्व काही नावातच आहे याचा प्रत्यय रायगडात निवडणूकांत येतो. राज्यात कुठेही नसेल परंतु रायगडमध्ये मात्र प्रत्येक लोकसभा विधानसभा निवडणूकीत नावांचे महत्व वाढते. प्रमुख पक्षाच्या उमेदवाराच्या नावाचे साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात उभे राहत असल्याने त्यांनाही नाव मिळते अशाच प्रकारे राजकारणातील दिग्गज सुनील तटकरे यांच्यामुळे रायगड मतदारसंघात निवडणूक लढवणारे अन्य दोन सुनील तटकरे यामुळेही चर्चेत आले आहेत.

निवडणूकीचे पडघम वाजू लागले की, रायगडात प्रमुख पक्षाचे उमेदवार कोण आहेत याचा अंदाज घेऊन नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराचा शोध सुरु होतो. केवळ नाव सारखे असलेल्या या व्यक्तीला महत्व तर येते. पक्षाशी एकनिष्ठ असलेले इर्षेने तर काहीजण चांगले मानधनही वाट्याला येते यामुळे रिंगणात उतरतात. रायगड जिल्ह्यात बॅ. अंतुले, दत्ता पाटील, दि. बा. पाटिल, रामशेठ ठाकूर, मिनाक्षी पाटील, सुनील तटकरे अशी दिग्गज नेत्यांचा उल्लेख होतो. एका निवडणूकीत त्याच्याच नावाचे अन्य उमेदवार अनेकदा उभे राहिले आहेत. या सर्वसामान्यांना या नेत्यांमुळे ओळख मिळाली. यावेळीही रायगड लोकसभा मतदारसंघात आता सोळा उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत शिवसेनेचे अनंत गीते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्या असली तरीही या मतदारसंघात तटकरे यांना अपक्ष म्हणून उभे असलेले अन्य दोन तटकरे अडचणीचे ठरणार आहेत.

नामसाधर्म्यांमुळे मागील निवडणूकीत चांगलाच फटका बसलेल्या सुनील तटकरे यांच्या नावामुळे या दोन तटकरेही प्रसिध्दीच्या झोतात आले आहेत. सुनील पांडूरंग तटकरे व सुनील सखाराम तटकरे हे दोन अपक्ष उमेदवार मतविभागणीसाठी तयार आहेत. सुनील सखाराम तटकरे यांचा वॉटर प्युरिफायर दुरुस्तीचा व्यवसाय असून ते म्हसळा तालुक्यातील सावर गौळवाडीतील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण दहावी नापास आहे. तर सुनील पांडूरंग तटकरे यांचा व्यवसाय शेती आहे ते खेड तालुक्यातील पोयनार अलाटीवाजीतील रहिवासी असून नववी शिकलेले आहेत. नामसाधर्म्याचा फॉर्म्युला उमेदवारांना कधी अडचणीचा ठरला असेल अथवा नाही. परंतू सर्वसामान्य ग्रामस्थांना मात्र नामसाधर्म्यामुळे ओळख मिळाली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: general candidates are getting recognition because of Name similarity