PHOTO : लाखो रुपये देणारा सोनेरी मासा असतो असा

राजेश कळंबटे 
Monday, 12 October 2020

या जातीच्या सर्वात लहान माशाची किंमत 8 ते 10 हजार रुपये

रत्नागिरी : ‘सोनेरी’ मासळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या घोळ मासा सापडणे म्हणजे मच्छीमारांसाठी पर्वणीच असते. चार दिवसांपुर्वी रत्नागिरीत एका मच्छीमाराला लॉटरी लागली पण जाळं फाटलं आणि घोळ झाला. घोळ माशामध्ये असलेल्या एअर ब्लॅडरला (हवेची पिशवी) परदेशात मोठी मागणी असते. त्यामुळे या माशाला लाखो रुपयांचा दर मिळतो. याबाबत मत्स्य संशोधक डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्याकडून घोळ माशाविषयी जाणून घेतले.

असा असतो घोळ मासा

घोळ माशाची लांबी 150, 180 सेंमी. व वजन 1015 किग्रॅ. पर्यंत असते. शरीर काहीसे चपट आणि लांबट असते. सर्व शरीरावर खवले असतात. मुस्कट लांब व टोकदार असते. पृष्ठपर जरासे जोडलेले असून त्यांचा पुच्छपर लांबट व निमुळता असतो. गुदपरावरील दुसरा काटा लांबट व जाडसर असतो. शरीरपोकळीतील वाताशय मोठे असते. जठरातील स्नायू वाताशयावर आपटून ते ओरडल्यासारखा घोगरा आवाज काढतात. हा आवाज ड्रम वाजविल्यासारखाही वाटतो. त्यामुळे त्यांना ड्रमर फिश’ असेही म्हणतात. हा आवाज कर्कश  अथवा खर्जातील आवाज काढल्यासारखा वाटतो म्हणून त्याला क्रोकर फिश असे नाव आहे.

 

या माशांच्या अन्नमार्गाला एक  पिशवी असते

घोळ हा मासा क्रोकर म्हणजे सायानिडी कुळातील माशांत मोडतो. समुद्राच्या पृष्ठभागावर राहणारे हे मासे जलद पोहणारे मासे आहेत. या माशांच्या अन्नमार्गाला एक हवेची पिशवी म्हणजे एअर ब्लॅडर जोडलेले असते. या पिशवीचा आकार गाजरासारखा असतो. या अतिरिक्त श्वसनाच्या अवयवामुळे पाण्याबाहेरही हवा घेऊन ती या पिशवीत साठवता येते. तसेच ही हवा साठवलेली पिशवी माशाला पाण्यात वर  किंवा खाली तरंगण्यास मदत करते. या पिशवीच्या मदतीने हे मासे काही आवाज ही काढू शकतात. फिश माँ म्हणूनही या पिशव्या ओळखल्या जातात.

हेही वाचा- कोल्हापुरातून रत्नागिरीत गेलेल्या सलाईनच्या 28 बॉक्सची चौकशी होणार -

या देशात मोठी मागणी

घोळ माशाच्या नरांना असणार्‍या या पिशव्या माद्यांच्या पिशवीपेक्षा जास्त दर्जेदार असतात आणि म्हणून त्यांना चांगला दर मिळतो. ही  पिशवी सुकवून विकल्यास किलोमागे रु. 40,000 ते 50,000 मच्छिमाराला मिळू शकतात. या हवेच्या पिशवीला चीनमध्ये मोठी मागणी असल्याचे ही त्यांनी सांगितले. घोळसारख्या माशांच्या हवेच्या पिशवीचा आणखी एक उपयोग म्हणजे त्यांच्यापासून शस्त्रक्रियेत वापरले जाणारे सुचर्स किंवा धागे हे जखम शिवण्यासाठी वापरले जातात. काही कालावधीनंतर हे धागे विरघळून जाऊ शकतात. म्हणूनच चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरला मोठ्या प्रमाणात हे फिश माँ निर्यात केले जातात.

असा होतो उपयोग

हवेच्या पिशव्यांचा दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे आयसिंग्लास. बिअर किंवा वाईन बनवण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आयसिंग्लास वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. यामधील सूक्ष्मकण काढून बिअर किंवा वाईन क्रिस्टल क्लियर करण्यासाठी घोळ माशाच्या सुकवलेल्या हवेच्या पिशव्या वापरल्या जातात. कोलॅजेनने बनलेल्या या पिशव्यांचे धागे, बिअर किंवा वाईनमध्ये भिजून अतिशय बारीक आसांची जाळी तयार करतात. त्यात बिअर किंवा वाईन बनवण्यासाठी फेरमेंटेशन प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या यीस्टचे अतिसूक्ष्म कण अडकून पडतात. हे वेगळे केले की क्रिस्टल क्लियर बियर किंवा वाईन मिळते. हे सूक्ष्म कण काढून टाकण्यासाठी इतर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली तर ती या पेयांच्या चवीत बदल घडवून, त्याला मारक ठरू शकते. त्यामुळे बहुसंख्य ब्रेव्हरीज आयसिंग्लास वापरणे पसंत  करतात.

 

प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून या फिश माँला चायनीज मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. चायनीज आहारात समुद्रातून मिळणार्‍या चार चविष्ट सीफूड्स पैकी एक म्हणजे हे फिश माँ! यात स्निग्ध घटक कमी असतात पण यात ग्लायसिन, प्रोलीन, ग्लुटामिक आम्ल, अलानाईन आणि अर्जिनाईन या अमिनो आम्लांचे प्रमाण जवळ जवळ 66.2% असते. पारंपरिक शक्तिवर्धक औषध म्हणून या फिश माँचा उपयोग पुरातन काळापासून आशिया खंडात केला जात आहे तो याच मुळे! खाद्यपदार्थ बनवण्यासाठी ही या फिश माँचा उपयोग चीनमध्ये केला जातो. कोलॅजेनचा उत्तम स्रोत म्हणून आणि शरीरातील रक्त पुरवठा सुधारण्यासाठी फिश माँपासून खाद्यपदार्थ येथे बनवले जातात. उष्ण वाळूत ते छान स्वच्छ पांढरे होईपर्यंत भाजून किंवा तेलात तळून  आवडीने खाल्ले जातात. फिश माँमध्ये कोणतेही सॉस जाऊन ते छान  स्पॉन्जी होतात. म्हणून  त्यांच्यापासून काही सूप्स ही बनवली जातात. यासाठी सुकवलेली फिश माँ वापरली जातात.

घोळ हा फी फिश म्हणजे स्निग्धता असणारा मासा आहे. यातील ओमेगा 3 स्निग्धाम्ल हे हृदयविकारांवर अतिशय उपयुक्त आहे. त्याच्या त्वचेपासून जिलेटीन मिळवता येते. एकूणच विचार करता घोळ मासा हा मासेमारांसाठी एक सागरी खजिनाच म्हणता येईल असा  मासा आहे. थव्याने राहणारे हे मासे किनार्‍याशी खडकाळ भागात पावसाळ्यात अंडी घालायला येतात. जाळ्याने  किंवा किनार्‍याजवळ गरवून हे मासे पकडले जातात. त्यामुळे सध्या मिळणारे हे मासे खवैय्यांसाठी जशी पर्वणी आहे तशी मच्छिमारांसाठी एक पर्वणीच असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- Good News : लवकरच ग्रंथालये होणार सुरू -

लहान माशाची किंमत 8 ते 10 हजार रुपये

दरम्यान, या जातीच्या सर्वात लहान माशाची किंमत 8 ते 10 हजार रुपये तर गतवर्षी मुंबईत सापडलेल्या माशाला 5 लाख 16 हजार रुपये दर मिळाल्याची उदाहरणे आहेत. रत्नागिरीत दोन वर्षांपुर्वी मिळालेल्या घोळ माशाला एक लाख रुपये किमंत मिळालेली होती. रत्नागिरीच्या किनार्‍यावर या माशाचे वास्तव्य यंदा आढळून आले आहे. मिर्‍या, जयगड, गणपतीपुळे समुद्रात हा मासा आढळतो. किनार्‍यावरील खडपात म्हणजेच समुद्री दगडांमध्ये याचे वास्तव्य असून परतीच्या पावसाच्या दरम्यान तो किनारी भागात आढळत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ghol fish information research articles by rajesh kalambate