मुलींच्या आश्रमशाळा अधीक्षिकांविना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

आश्रमशाळांत महिला अधीक्षिका नसल्याने विद्यार्थिनींच्या समस्यांत भर पडली आहे...

नेरळ - कर्जत तालुक्‍यालगत खालापूर तालुक्‍यातील डोलवली येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळेत दोन दिवसांच्या किरकोळ आजाराने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या आश्रमशाळेतील महिला अधीक्षिकेचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. 

कर्जत तालुक्‍यातील पाचपैकी चार आश्रमशाळांत महिला अधीक्षिकाच नाहीत. तीन ठिकाणी स्थानिक शिक्षिका आणि एका ठिकाणी तर चक्क स्वयंपाकी महिलेकडे अधीक्षिकापदाची जबाबदारी दिली आहे!

बहुतेक ठिकाणचे सर्व शिक्षक मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे शहरात राहून १५-२० आणि ४०-५० किलोमीटरवरून ये-जा करतात. कर्जत तालुक्‍यात भालीवडी, पिंगळस, पाथरज, कळंब, चाफेवाडी अशा पाच ठिकाणी सरकारी आणि माणगाववाडी येथे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहे. 

निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी पुरुष अधीक्षक आणि विद्यार्थिनींकडे लक्ष देण्यासाठी महिला अधीक्षिका यांच्या नियुक्‍त्या आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येतात. मोठ्या प्रमाणात मुली शिक्षण घेत असल्याने कायमस्वरूपी निवासी तत्त्वावर महिला अधीक्षिकांचे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आश्रमशाळेतील मुलींच्या शारीरिक आरोग्य, शिक्षण, समुपदेशन, शारीरिक अडचणी, यांच्याविषयीची जबाबदारी दिलेली असते. ते पद त्यासाठीच निवासी ठेवण्यात आले आहे. मुली वयात आल्यानंतर त्यांच्या शरीरातील बदलांची जाणीव करण्याची जबाबदारी महिला अधीक्षिका पार पाडत असतात.

भालीवडी येथे १०० टक्के मुलींची सरकारी आश्रमशाळा आहे. तेथील महिला अधीक्षक पद जानेवारी २०१४ पासून रिक्त होते. त्या ठिकाणी कळंब येथील सरकारी आश्रमशाळेतील महिला अधीक्षिकांना जून २०१६ मध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. त्याचवेळी कळंब येथील १७० मुले-मुली शिकत असलेल्या आश्रमशाळेची जबाबदारी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या शिक्षिकेवर सोपवली आहे. त्या शिक्षिका तेथे राहत नसल्याने तात्पुरता भार सोपवून काही फायदा नाही. पाथरज येथील कायमस्वरूपी महिला अधीक्षिकाचे पद भरले आहे; पण तेथील शिक्षकवर्ग निवासी व्यवस्था असतानाही तेथे न राहता शहराच्या ठिकाणी राहत असल्याचे दिसून येते. चाफेवाडी या आश्रमशाळेत तर अनेक वर्षे महिला अधीक्षिका यांच्या रिक्त पदाचा कार्यभार स्वयंपाक बनविणाऱ्या महिलेकडे दिला आहे.

Web Title: Girls ashram school with out superintendent