मुलींचे शूटिंग घेणाऱ्या केळुसमधील युवकावर गुन्हा

बुधवार, 3 एप्रिल 2019

कुडाळ - परुळे पंचक्रोशीतील एका विद्यालयातून घरी जाणाऱ्या विद्यार्थिनींचे मोबाईलवर फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करणारा केळुस येथील संशयित महादेव राऊळ या युवकावर निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

कुडाळ - परुळे पंचक्रोशीतील एका विद्यालयातून घरी जाणाऱ्या विद्यार्थिनींचे मोबाईलवर फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करणारा केळुस येथील संशयित महादेव राऊळ या युवकावर निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याबाबत त्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी निवती पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात म्हटले की, सध्या शाळेची वेळ ही सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत असून रोजच्याप्रमाणे आज सकाळी ११ वाजता शाळा सुटल्यानंतर काही मुली बसने जाण्यासाठी केळुस तिठा येथील बस थांब्याकडे थांबल्या होत्या. या वेळी तेथे असलेल्या एका युवकाने त्या विद्यार्थिनींचे फोटो व व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या मुली घाबरल्या. ही घटना तेथे असलेल्या रिक्षा चालकाने मुख्याध्यापकांना सांगितली. 

ही घटना समजताच तत्काळ बस स्टॉपकडे पोहचत त्या युवकाला त्यांनी निवती पोलिसांच्या ताब्यात दिले. या वेळी या युवकाची अधिक माहिती विचारली असता त्याने महादेव राऊळ असे नाव सांगितले. याच्या विरोधात मुख्याध्यापकांनी निवती पोलिस ठाण्यात विद्यार्थिनीचे मोबाईलचा वापर करीत फोटो, व्हिडिओ शूटिंग केल्याच्या तसेच अश्‍लील इशारे केल्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी संशयित राऊळ याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.