कोकण कन्यांच्या धाडसाला सलाम! कोरोनाग्रस्तांच्या सेवेने करिअर सुरू

अजय सावंत
Monday, 21 September 2020

या विद्यार्थिनींनी न डगमगता कोरोना सेंटरमध्ये काम स्वीकारले. सर्वसामान्य रुग्णांना सर्वच सेवा देतात; पण कोरोनाग्रस्तांना सेवा देणे हे सामान्य काम नाही. तरीही हे इंद्रधनुष्य सिंधुदुर्गच्या पाचही मुलींनी लिलया पेलले.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - सध्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येणेही हायरिक्‍स मानले जाते; मात्र अशा रुग्णांना सेवा देण्याचे धाडस कोकण कन्यांनी केले आहे. एका भयानक आजाराच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांना केवळ सेवाच नाही तर त्यांचे आत्मबल वाढवण्याचे काम येथील बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या पाच विद्यार्थिनी कोल्हापुरात करत आहेत. 

आपल्या करिअरची सुरुवात चांगली व्हावी, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते; मात्र या पाचही विद्यार्थिनींनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवेची सुरुवात कोरोनाग्रस्तांच्या सेवेने केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्थ अभिमान वाटावा अशा या पाच विद्यार्थिनी सद्यस्थितीत सिद्धगिरी हॉस्पिटल रिसर्च सेंटर कणेरी मठ कोल्हापूर येथील कोरोना सेंटरमध्ये सामाजिक कार्याचा वसा जोपासत आहेत. 

मुळगाव रेडी येथील चैताली राजेंद्र राणे, ऋचिता राजेंद्र धुरी (साळगाव), भाग्यश्री मनोहर खवणेकर (आंदुर्ले), कोमल विलास सावंत (बिबवणे), रुपाली मंगेश रुपये (पोयरे देवगड), अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत. लॉकडाउन काळातील रिकामा वेळ सार्थकी लागावा यासाठी आरोग्य क्षेत्राचे शिक्षण घेतले. त्यातच काम करण्याची इच्छा या विद्यार्थिनींची होती. 

या अनुषंगाने चैतालीने काही हॉस्पिटलशी थेट संपर्क साधून रुग्णसेवेची इच्छा व्यक्त केली. यामध्ये कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर कणेरी मठाशी संपर्क झाला. नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या कुडाळ येथील बॅ.नाथ पै महाविद्यालयाचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मनोदय व्यक्त केला. त्यांनीही पाठिंबा दिला. 

सामान्य काम नाही, तरीही... 
या विद्यार्थिनींनी न डगमगता कोरोना सेंटरमध्ये काम स्वीकारले. सर्वसामान्य रुग्णांना सर्वच सेवा देतात; पण कोरोनाग्रस्तांना सेवा देणे हे सामान्य काम नाही. तरीही हे इंद्रधनुष्य सिंधुदुर्गच्या पाचही मुलींनी लिलया पेलले. आजार कोणताही असो; पण अशावेळी रुग्णाला गरज असते ती मानसिक आधाराची व त्यांचे मनोबल वाढवण्याची. यातही या कोकणकन्या मागे पडल्या नाहीत.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girls from Sindhudurg provide services to Corona patients in kolhapur