गोव्यातील मद्यपी सिंधुदुर्गात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

सावंतवाडी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात दारू विक्री बंद आहे. त्यामुळे मद्यपींनी जिल्ह्यातील सीमाभागात आपला मोर्चा वळविला आहे. दारू वाहतुकीविरोधात चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी गोव्यासोबत महाराष्ट्र पोलिस चौकीवरही कडक तपासणी करण्यात येत आहे.

सावंतवाडी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात दारू विक्री बंद आहे. त्यामुळे मद्यपींनी जिल्ह्यातील सीमाभागात आपला मोर्चा वळविला आहे. दारू वाहतुकीविरोधात चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी गोव्यासोबत महाराष्ट्र पोलिस चौकीवरही कडक तपासणी करण्यात येत आहे.

शनिवारी (ता. ४) गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी गोवा राज्यात निवडणूक काळातील आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे. तेथे बंदोबस्तही चोख आहे. निवडणूक काळात दारू व पैशाचा वापर करून आमिषे दाखविली जातात. शिवाय गोवा बनावटीच्या दारूचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. यासाठी गोवा राज्यातील बरीचशी दारू दुकाने निवडणूक काळात बंद ठेवण्याचे आदेश गोवा सरकारकडून देण्यात आले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर तपासणीही करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र सीमेवरील बऱ्याच ठिकाणी दारू विक्री तेजीत असल्याचे चित्र आहे.

गोव्यातील मद्यपी सिंधुदुर्गच्या सीमेवर येत असल्याचे उलटे चित्र सध्या दिसत आहे.

पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सिंधुदुर्गात दारूच्या अवैध विक्रीविरोधात कडक धोरण अवलंबिले आहे. तरीही काही ठिकाणी दारूविक्री छुप्या पद्धतीने होत आहे. गोवा सीमेवर स्थित असलेल्या महाराष्ट्रातील या ठिकाणांचा शोध गोव्यातील बरेच नागरिक घेत असल्याचे दिसून येत आहे. गोव्यातील दारूच्या तुलनेत महाराष्ट्रातील दारू महाग आहे. मात्र दारूसाठी याचा विचार न करता बऱ्याच जणांनी आपला मोर्चा महाराष्ट्रातील 
बार व दारू दुकानांकडे वळविला आहे.

आरोंदासह तीन चौक्‍यांवर तपासणी
दरम्यान, सीमेवरून दारूवाहतूक होऊ नये, यासाठी महाराष्ट्राच्या आरोंदा, सातार्डा, इन्सुली, तेरेखोल अशा पोलिस चौक्‍यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक काळापर्यंत ही कार्यवाही सुरू राहणार आहे.

Web Title: goa alcoholic in sindhudurg